Wednesday, July 24, 2024
Homeमहत्वाची बातमीआरोग्य विभागातर्फे विद्यार्थ्यांना दिलेल्या गोळ्या बुरशीयुक्त!

आरोग्य विभागातर्फे विद्यार्थ्यांना दिलेल्या गोळ्या बुरशीयुक्त!

भंडारा : भंडारा तालुक्यात अकरावीच्या विद्यार्थ्यांना वितरित केलेल्या काही गोळ्या बुरशीयुक्त आढळून आल्याने विद्यार्थी, पालकांसह आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. ‘राष्ट्रीय जंतनाशक दिना’ निमित्त सोमवारपासून भंडारा जिल्हा आरोग्य प्रशासनाच्यावतीने एक ते एकोणीस वयोगटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वितरणाची मोहीम सुरू केली. भंडारा तालुक्यातील खरबी येथील विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे सोमवारी सकाळी ११ वाजता जंतनाशक गोळ्या वितरण सुरु केले होते.

या शाळेत ४५० गोळ्या वितरणासाठी आरोग्य विभागाने दिल्या होत्या. अकरावीच्या विद्यार्थ्यांना गोळ्या वितरित करीत असताना एका स्ट्रिपमध्ये काही गोळ्या बुरशीयुक्त आढळून आल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुख्याध्यापकांनी गोळ्यांचे वितरण तातडीने थांबवले आणि त्याची माहिती आरोग्य विभागाला दिली. विशेष म्हणजे या बुरशीयुक्त गोळ्या असलेल्या स्ट्रीपमधून ७ विद्यार्थ्यांना गोळ्या देण्यात आल्याचे समोर आले.

त्यानंतर या विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्यास सुरुवात झाली. संबंधित बॉक्स मधील अनेक स्ट्रिपमध्ये बुरशीयुक्त गोळ्या आढळून येत असल्याने भंडारा आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाले असून आरोग्य विभागाच्या या जीवाशी खेळण्याचा प्रकारामुळे पालक मात्र कमालीचे संतप्त झाले.

या प्रकाराची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या पथकासह शाळेला भेट दिली. बॅच क्रमांक एईटी २१६ मध्ये तीन गोळ्या बुरशीयुक्त आढळून आल्याचे चौकशीत आढळून आले. या गोळ्या ताब्यात घेत बुरशीयुक्त गोळ्या असलेल्या स्ट्रीपमधून ज्या सात विद्यार्थ्यांनी गोळ्या घेतल्या त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मात्र, त्यांची प्रकृती अद्याप व्यवस्थित असून आरोग्य विभागाकडून देखरेख ठेवण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -