शिबानी जोशी
भारतात सुमारे ४०० जाती आणि ५००० उपजाती आहेत असं मानलं जातं. विविध जाती, उपजातींमध्ये विभागलेला हा समाज हिंदू या छत्रछायेखाली अनेक वर्षे भारत देशात एकत्र नांदतो आहे. या समाजात असणारा एक घटक म्हणजेच भटक्या आणि विमुक्त जमाती. या समाजात ४८ जाती, २०० उपजाती आहेत असं मानलं जातं. गावोगावी भटकत असल्यामुळे यांना सांगायला गाव नाही आणि राहायला घर नाही. भिल्ल, पारधी, वैदू, वडार, बहुरूपी, वासुदेव, नाथजोगी, नंदीबैलवाले, मरीआईवाले, धनगर, शीतलकार, बंजारा, कोलाटी अशा काही महाराष्ट्रातल्या भटक्या-विमुक्त जाती म्हणता येतील. सततच्या भटकंतीमुळे त्यांची कुठेही शासकीय नोंद नव्हती. काही राज्यांनी त्यांचा एससीमध्ये, तर काही राज्यांनी त्यांचा एसटीमध्ये समावेश केला आहे. केंद्र शासनाच्या सूचीमध्ये त्यांचा ओबीसीमध्ये समावेश केला गेला आहे.
या गटासाठीही शिक्षण, स्वावलंबन, सन्मान, सुरक्षा पोहोचली पाहिजे यासाठी काही तरी काम करावं, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांना जाणवलं त्यासाठी अशीच एक घटनाही घडली.
२ ऑक्टोबर १९९१ साली पुण्यामध्ये भटक्या-विमुक्त विकास परिषदेची स्थापना झाली. दादा इदाते त्याचे अध्यक्ष झाले. दादा इदाते दापोलीला राहायचे; परंतु जवळजवळ पहिली वीस वर्षे दर महिन्याला पाचशे किलोमीटर अंतर कापून ते प्रकल्पाच्या कामासाठी जात असत. गिरीश प्रभुणे यांनी या प्रकल्पासाठी खूप मोठे योगदान दिलं, अनेक माणसं जोडली, वेगवेगळे जाती-जमातींचे प्रश्न पुढे आणले. विवेकच्या रमेश पतंगे यांनीही ‘विवेक’ साप्ताहिकातून वेळोवेळी प्रसिद्धी दिली, निधीसाठी आवाहन केले आणि त्यामुळे खूप मोठा निधी उभारायला मदत झाली. असे अनेक संघाचे निरलस कार्यकर्ते प्रकल्पामध्ये अथकपणे काम करत राहिल्यामुळे बत्तीस वर्षे हा प्रकल्प नवनवीन उपक्रम हाती घेऊ शकला आहे. १९९३ मध्ये पारधी समाजाचा पहिला मेळावा सोलापूर येथे आयोजित करण्यात आला. त्याच वर्षी १९९३ मध्ये यमगरवाडी येथे एकलव्य विद्यार्थी वसतिगृह आश्रमशाळेची स्थापना झाली. त्या भागातले चाटुफळे नावाचे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी १८ एकर जमीन या कामासाठी दान केल्यामुळे यमगरवाडीसारख्या ठिकाणी अशा प्रकारची शाळा सुरू करणं शक्य झालं. त्या भागात पारधी समाजाची संख्या खूप होती. त्यांच्याशिवाय ४० ते ४८ जाती-जमातींतील ४५० ते ५०० मुलं गेली ३०-३२ वर्षे इथे आता शिक्षण घेत आहेत. हजारो मुलं शिकून बाहेर पडली. मुलींसाठी वेगळे वसतिगृह सुरू केलं. त्यातील एक-दोन महिला आता नगरसेविका झाल्या आहेत. मुलींना शिक्षणानंतर नर्सिंगचे शिक्षण सुरू केल्यामुळे अनेक मुली मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या-मोठ्या रुग्णालयात नर्स म्हणून सेवा देत आहेत. मुंबईतल्या फोर्टिस रुग्णालयात इथली एक मुलगी परिचारिका म्हणून काम करत आहे. मुलांपैकी काही जणांनी स्वतः सोलापूर येथे आश्रमशाळा सुरू केलेली आहे. कोणी सरपंच, कोणी राजकारणात गेला आहे. यमगरवाडीच्या शाळेत मुलांसाठी शेती तसेच वेल्डिंग, इलेक्ट्रिसिटी प्रशिक्षणही दिलं जातं. शाळेतल्या वसतिगृहात या शेतीतून आलेली भाजी वापरली जाते तसेच शाळेतील वसतिगृहातील इलेक्ट्रिकची कामंही हीच मुलं करतात.
ज्या मुलांना शाळेमध्ये येऊन शिकता येत नाही, अशांसाठी इथेच मग ‘पालावरची अभिनव शाळा’ हा उपक्रम सुरू झाला. त्यांना चौथीपर्यंत शिक्षण या शाळेत दिलं जातं आणि नंतर यमगरवाडी किंवा त्यांच्या गावातच शाळा असेल, तर तिथे ती मुलं शिकायला जाऊ शकतात; परंतु सुरुवातीचं शिक्षण त्यांच्या पालावरच झाल्यामुळे ते शिक्षणाच्या प्रवाहात तरी येऊ शकतात हे महत्त्वाचं ठरतं. सुरुवातीची पाच-सात वर्षे कठीण गेली. या मुलांना जमवून आणि त्यांना टिकवणं हे फार कठीण काम होतं; परंतु नंतर त्यांना या गोष्टीचे महत्त्व कळल्यावर आता मात्र ही मुलं येऊ लागली आहेत.
यमगरवाडी इथे त्यानंतर आणखी काही जमीन घेऊन आता एकूण ३८ एकरावर हा प्रकल्प सुरू आहे. त्यात अगदी शेती हा विषयही शिकवला जातो. फक्त शिक्षण देऊन उपयोग नाही, तर त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे म्हणून कौशल्याधारित शिक्षण ही इथे दिलं जातं. सन्मान आणि रोजगार मिळाला की, हात आणि डोकं इथे तिथे जायचेच नाहीत, असा विचार करून या मुलांचं संगोपन या प्रकल्पात केलं जातं. चांगलं आणि निस्वार्थी काम केलं की, हजारो हात येऊन मिळतात. त्याप्रमाणे मग या कामाची मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद या ठिकाणी नोंद झाली आणि बघता बघता या बीजाचा वटवृक्ष झाला. पुण्यात तर ‘यमगरवाडी मित्र मंडळ’ अशी एक संस्था स्थापन झाली. त्याने हरप्रकारे या प्रकल्पाला मदत केली आहे.
भटके-विमुक्त विकास परिषदेच्या अंतर्गत हळूहळू असे मोठे मोठे प्रकल्प सुरू झाल्यामुळे अकाऊंट्स राखण्यासाठी किंवा व्यवस्थापन राखण्यासाठी, निधी येऊ लागल्यावर त्याचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी व्यवस्थापन वेगळं केलं गेलं आहे. भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठान या नावाने कामाची नोंदणी करण्यात आली आहे. आणखी एक असाच प्रकल्प म्हणजे गोपालन करणारा तसेच दूध विकणारा समाज. म्हणजेच गोपाळ समाज, या समाजातही शिक्षणाची, विकासाची गंगा वहावी यासाठी १९९५ साली अनसरवाडा येथे गोविंद महाराज गोपाळ समाज विकास परिषद हा प्रकल्प सुरू झाला. त्यानंतर नेरले इथे कोलाटी समाजासाठी प्रकल्प सुरू झाला. अशा प्रकल्पांमुळे विविध भागांतल्या विविध जाती-जमाती शिक्षणाशी, बाहेरच्या जगाशी जोडल्या गेल्या. हे सर्व काम सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, समरसता मंच, विवेक साप्ताहिक येथील कार्यकर्ते पूर्णपणे पाठीशी उभे राहिले, सहकार्य केलं. त्यामुळेच इतकं मोठं काम उभं होऊ शकलं. त्याशिवाय आज अनेक कार्यकर्ते संस्थेत वर्षांनुवर्षे काम करत आहेत.
दादा इदाते यांचा भटक्या विमुक्त जाती-जमातींचा खूप अभ्यास होता. त्यांचे प्रश्न स्वतः जाऊन त्यांनी हाताळले होते. हे सर्व काम पाहून महाराष्ट्र शासनाने १९९६ साली दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली भटके-विमुक्त अभ्यास व संशोधन समितीची स्थापना केली आणि या समाजाच्या प्रश्नाची नोंद घेतली.२००० साली लातूर इथे भटक्या विमुक्तांचा ‘अस्मिता जागरण मेळावा’ घेऊन त्यांच्यामध्ये अस्मितेचं बीज पुरवण्याचं काम सुरू झालं. हिंगोली येथे नाथजोगी समाजासाठी २००१ साली नाथजोगी विकास सेवा संघ स्थापन झाला. डोंबारी, वडारी या समाजाची मुलं शाळेत येऊ शकत नाहीत. कारण, त्यांनाही आपल्या आई-वडिलांबरोबर काम करावं लागतं, हे लक्षात घेतल्यानंतर ‘पालावरची अनुभव शाळा’ हा एक अभिनव उपक्रम परिषदेने सुरू केला. १४ एप्रिल २०११ रोजी एकलव्य विद्या संकुलाच्या लोकार्पणासाठी स्वतः संघ सरसंघचालक उपस्थित होते. २०१२ पासून भटके विमुक्त समाज पंच संमेलन पंच परिषद या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली. या प्रतिष्ठानाबद्दल अधिक माहिती पुढच्या भागात जाणून घेऊ या.