मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. ‘मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्रशिंग होत आहे. मात्र, हा ऊस असाच जास्त लावत रहाल, तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द लक्षात ठेवा. कारण साखर सरप्लस झाली आहे,’ असा गंभीर इशाराच गडकरी यांनी दिला.
गडकरी पुढे म्हणाले, ‘आज पाणी हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आपण पाणी उपलब्ध केले, तर शेतकऱ्यांचे उत्पन्न अडीच पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. ते पाणी जर ड्रीपने दिले, तर फारच चांगले आहे. सोलापूर जिल्हा एकेकाळी दुष्काळी होता’. ‘सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्रशिंग होत आहे. पण हा ऊस असाच जास्त लावत राहाल, तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा,’ असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. ते सोलापूरमध्ये बोलत होते.
‘दोन दिवसांपूर्वी माझ्याकडे ब्राझिलचे मंत्री आणि शिष्टमंडळ आले होते. ब्राझिलमध्ये दुष्काळ पडला म्हणून तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे. पण ब्राझिलमध्ये साखर वाढली, तर साखरेचा दर २२ रुपये प्रतिकिलो होईल.
दुसरीकडे उसाचा दर कमी करता येणार नाही. कारण तुम्हाला राजकारण करायचे आहे. त्यामुळे उसाचा भाव तेवढाच द्यावा लागेल, मग काय स्थिती होईल ते बघा,’ असा इशारा गडकरी यांनी कारखानदारांना दिला.