
मुंबई : भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख थेट हिटरलरशी केला आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक व्यंगचित्र शेअर करण्यात आलं आहे. त्यामध्ये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे व्यंगचित्र दिसून येत आहे. तसेच, हिटरलरही असाच अहंकारी होता, असे कॅप्शन देण्यात आले आहे. हा इगो नावाचा फुगा अगदी आकाशाला भिडला तरी हरकत नाही, पण २०२४ ला एवढ्याशा टाचणीने धडामकन् फुटने एवढी नक्की..! असेही भाजपने म्हटले आहे. व्यंगचित्रात मतदारांच्या हाती टाचणी दिसून येते.
राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा संघर्ष चांगलाच पेटला आहे. त्यातच, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिंदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यातील राजकारण हे वेगळ्याच वळणाला गेल्याचं दिसून येत आहे. त्यातच, राणा विरुद्ध शिवसेना संघर्षही पाहायला मिळाला. त्यावरुन, मुंबईत चांगलाचा संघर्ष चिघळला होता. राणा दाम्पत्यास भाजपचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोपही करण्यात आला. तर, राणा दाम्पत्यास अटक झाल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नवनीत राणा यांचे तुरुंगात हाल झाल्याचे म्हटले. दरम्यान, राणा दाम्पत्यास भेटण्यासाठी गेलेल्या खासदार किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यावरुन, राज्यातील भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला.
https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1518847505626136577
दरम्यान, राणा दाम्पत्याला अटक, किरीट सोमय्यांवरील हल्ला, मोहित कंबोज यांच्या गाडीवरील हल्ल्यामुळे भाजप नेते शिवसेना आणि राज्य सरकावर आरोप करत आहेत. पोलिसांना हाताशी धरुन, पोलिसांचा गैरवापर करुन कायदा व सुव्यव्था बिघडत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. त्यातूनच, शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टिका करण्यात येत आहे.