मुंबई : गुणरत्न सदावर्ते सध्या आर्थर रोड जेलमध्ये असून त्यांचे सध्या उपोषण सुरू आहे. मागच्या १५ दिवसांपासून सदावर्ते जेवत नसून ते ज्या ज्या पोलीस ठाण्याच्या कोठडीत होते, तिकडचे पोलीस वेळोवेळी सदावर्तेंना अन्न ग्रहण करण्याची विनंती करत होते. मात्र सदावर्ते सकाळ-संध्याकाळ केवळ ज्युस पित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आत्तापर्यंत गावदेवी, सातारा, कोल्हापूर पोलिसांनी सदावर्तेंची कोठडी घेतली होती.
सदावर्ते सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. तिथे त्यांनी जेवण न करण्याचे ठरवले आहे. सरकारी वकील अरुणा पै यांनी ही माहिती दिली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या हिंसक आंदोलन प्रकरणात वकील गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर केला असला तरी इतर गुन्ह्यांमधून त्यांची सुटका झालेली नाही. गुणरत्न सदावर्ते यांची रवानगी पुन्हा एकदा आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे.
दरम्यान, पुण्यातल्या विद्यापीठ पोलीस ठाण्यात वकील गुणरत्न सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे पोलिसांनी ताब्यात घेण्याचा अर्ज केला होता, मात्र त्यांच्याकडे हा ताबा देण्यात आलेला नाही. पुढील कारवाई मुंबईतून होईल, असे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे.