
पालघर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांना एका शिक्षिकेकडून २५ हजारांची लाच घेताना पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. याप्रकरणी वादग्रस्त शिक्षणाधिकारी लता सानप यांना पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षकाची बदली करण्यासाठी ही लाच मागितली असल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. या घटनेमुळे पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागली असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरु आहे.
पालघरमध्ये शिक्षणाधिकारी लता सानप यांच्या विरोधात अनेक तक्रारी करून त्यांची बदली करावी, यासाठी अविश्वासाचा ठराव जिल्हा परिषदेच्या सभेत घेण्यात आला होता व तो मंजूर झाला होता. जिल्ह्यातील एका शिक्षिकेची बदली करण्यासाठी शिक्षणाधिकारी लता सानप यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर सानप यांच्या घरात २५ हजारांची लाच घेताना त्यांना ताब्यात घेतले असल्याचे लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांनी सांगितले.