मुंबई (प्रतिनिधी) : गेले काही दिवस उन्हाच्या झळांमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना सोमवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. गेले काही दिवस ४० अंशाच्या जवळ पोहोचलेल्या तापमानात काहीशी घट झाली आहे. सोमवारी मुंबईतील तापमानात काहीशी घट झाली असून सांताक्रूझ येथे ३५.४, तर कुलाबा येथे ३४.० अंश सेल्सिअसची नोंद झाली.
दरम्यान गेल्या आठवड्यात मुंबईतील तापमान ४० अंशाच्या जवळ गेले होते. यामुळे मुंबईकर हैराण झाले होते, तर उन्हाचा शारीरिक त्रास मुंबईकरांना होत होता. मुंबई पालिकेने दुपारी घराबाहेर न पडण्याचे तसेच उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विविध उपाय सांगितले होते.
रविवारी सांताक्रूझ येथे ३७.४, तर कुलाबा येथे ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. सोमवारी त्यात घट झाली असून सांताक्रूझ येथे ३५.४, तर कुलाबा येथे ३४.० अंश सेल्सिअसची नोंद झाली. २४ तासांत तापमानात अनुक्रमे २ आणि १.४ अंश सेल्सिअसची घट झाली.
विशेष म्हणजे राज्यात काही भागात पावसाळी वातावरण तयार झाले असून काही ठिकाणी पावसाच्या सरीदेखील कोसळल्या. पुढील ५ दिवसांत राज्यात तीव्र हवामान सक्रिय राहण्याची दाट शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या भागांत गडगडाटासह वादळी वारे, पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असे असले तरी दोन-तीन दिवसांनंतर काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.