मुंबई (प्रतिनिधी) : ‘माझ्यावर झालेला हल्ला हा ठाकरे सरकारकडून स्पॉन्सर हल्ला होता’, अशी थेट टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
इतकेच नाहीतर यावेळी त्यांनी पोलिसांवरही आरोप केले आहेत. ‘पोलिसांच्या संगनमताने हा हल्ला झाला आहे. तर माझ्या नावाची खोटी एफआयआर माझ्या सहीसह संजय पांडे यांनी दिली असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे. माझी एफआयआर लिहून का घेतली नाही?’, असाही सवालही यावेळी त्यांनी केला.
दरम्यान, ठाकरे सरकारने माझा मनसुख हिरेन करायचा प्लॅन आखला होता. पण देव आणि मोदी सरकारच्या कृपेमुळे माझा जीव वाचला. काल शिवसैनिकांनी फेकलेला दगड जरा वरती लागला असता तर मी कायमचा आंधळा झालो असतो, असे वक्तव्य सोमय्या यांनी केले.
पोलिसांनी मला गुंडांच्या हवाली केले
‘मी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री साडेनऊ वाजता येणार असल्याचे अगोदरच कळविले होते. त्यानुसार शिवसेनेचे ७० ते ८० गुंड अगोदरच पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. काहीजण पोलीस स्टेशनच्या आवारात उभे होते. आतमध्ये जातानाही त्यांनी मला शिवीगाळ केली. पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर मी बाहेर पडण्यापूर्वी माझ्यावर हल्ला होऊ शकतो, असे त्यांना सांगितले होते. मात्र, पोलिसांनी आम्ही शिवसैनिकांना दूर नेले आहे, सगळी चोख व्यवस्था केली आहे, असे सांगितले. मात्र, पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच पोलिसांनी मला शिवसेनेच्या गुंडांच्या हवाली केले. या हल्ल्यासाठी पोलीस आयुक्त संजय पांडे हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. शरद पवार असोत, अजित पवार, वळसे-पाटील असो किंवा संजय राऊत असो किंवा ठाकरे सरकार हे सगळे गुंडगिरी करतात. दादागिरी करतात घोटाळे करतात, त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागावी’, असे ते म्हणाले.