
मुंबई : ज्येष्ठ संगीतकार आणि गायक तथा लतादीदींचे कनिष्ठ बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवाच्या कृपेने ते येत्या ८-१० दिवसांत घरी परततील. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणाही होत आहे, अशी माहिती त्यांचे पुत्र आदिनाथ यांनी दिली. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार सोहळा रविवारी मुंबईत पार पडला. त्या कार्यक्रमातही हृदयनाथ मंगेशकर उपस्थित नव्हते. या पुरस्कार सोहळ्यात आदिनाथ यांनी उपस्थितांना संबोधित करताना वडिल पं. हृदयनाथ मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली होती. भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हृदयनाथ मंगेशकरांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.