Thursday, July 3, 2025

सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात - शरद पवार

सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात - शरद पवार

पुणे : सत्ता येते आणि जाते, पण त्यामुळे अस्वस्थ होण्याचे कारण नाही. पण सध्या काही लोक फार अस्वस्थ आहेत. पण त्यांना दोष देता येऊ शकत नाही. कारण निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार, मी येणार अशा घोषणा त्यांनी केल्या. पण ते घडू शकले नाही याची अस्वस्थता असते. पण या सर्वांना या परिस्थितीतून काय परिणाम हे लक्षात येईल आणि योग्य वातावरण निर्माण करण्यास सहकार्य लागेल अशी अपेक्षा करुयात, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. राज्यात हनुमान चालीसा पठणावरून निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर ते सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


भाजपाकडून राष्ट्रपती राजवट लागण्याची मागणी होत असल्यासंबंधी विचारण्यात आले असता पवार म्हणाले की, “सत्ता गेल्यानतंर लोक अस्वस्थ होतात. सगळे काय माझ्यासारखे नसतात. १९८० मध्ये माझे सरकार गेले. रात्री १२.३० वाजता मुख्य सचिवांनी मला ही माहिती दिली. त्यानंतर तीन चार मित्रांना बोलावले आणि घरातले सामान आवरले. सकाळी ७ वाजता दुसऱ्या जागेत राहायला गेलो, सरकारी गाडी सोडली. त्यादिवशी इंग्लंड आणि भारताचा सामना होता. १० वाजता वानखेडेवर सामना पाहण्यासाठी गेलो आणि दिवसभर सामन्याचा आनंद लुटला”.


“अस्वस्थ असलेले लोक कोणते मार्ग खुले आहेत या खोलात जाणार आणि त्याचा फार विचार करण्याची गरज नाही. राष्ट्रपती राजवट लावण्याच्या चर्चा केल्या जातात, दमदाटी केली जाते पण त्याचा काही परिणाम होत नाही. निवडणुका लागल्या तर निकाल काय लागतात हे कोल्हापूरने सांगितले आहे. त्यामुळे कोणी त्या टोकाला जाईल असे वाटत नाही,” असे शरद पवार किरीट सोमय्यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोलताना म्हणाले.


एखाद्या धर्मासंबंधी किंवा विचारासंबंधी प्रत्येक व्यक्तीच्या भावना असतात. त्या भावना आणि विचार आपल्या अंत:करणात आणि घरातच ठेवायच्या असतात, आपण आपल्या धार्मिक भावनांचे प्रदर्शन करायला लागलो आणि त्याआधारे अन्य घटकांसंबधी द्वेष पसरवला तर त्याचे परिणाम समाजावर दिसायला लागतात. महाराष्ट्रात हे कधीही होत नव्हते, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment