मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र दिनानिमित्त केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विकास संस्था, ‘झेप उद्योगिनी’ आणि ‘वी एमएसएमई’च्या सहकार्याने १ ते ३ मे दरम्यान वर्ल्ड ट्रेड सेंटर, येथे ‘महाराष्ट्र एमएसएमई एक्सपो २०२२’ हे तीनदिवसीय व्यावसायिक प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते रविवारी १ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या कार्यक्रमास वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष विजय कलंत्री, कार्यकारी संचालिका रूपा नाईक, एमएसएमई महाराष्ट्रचे संचालक प्रशांत पार्लेवार, दुबईस्थित पेशवा हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक सचिन जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक उद्योजकांना व्यवसायाची व सरकारसोबत व्यवसाय करण्याची नवी संधी प्राप्त होणार आहे. लघु-मध्यम उद्योग योजना, कॉर्पोरेट कंपन्यांसोबत व्हेन्डर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, मुद्रा कर्ज योजना, परदेशातील व्यावसायिक संधी, आयात-निर्यात या विषयावर मार्गदर्शन देखील मिळणार आहे. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून अनेक उद्योजक आपल्या व्यवसायाचे प्रदर्शन करणार आहेत. थेट उत्पादकांसोबत संवाद साधण्याची संधी या प्रदर्शनाद्वारे उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र एमएसएमई अचिव्हर्स’ या नियतकालिकाचे प्रकाशन देखील करण्यात येणार आहे.
तसेच या कार्यक्रमात महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राची कला आणि संस्कृतीचे सादरीकरण करणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. पंढरीच्या वारीने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून महाराष्ट्राची ओळख असणारा पोवाडासुद्धा सादर केला जाणार आहे. पैठणी नेसून केला जाणारा रॅम्प वॉक हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. सोबतच काही यशस्वी उद्योजकांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे.