पानांच्या पत्रावळी बनवण्याचा व्यवसाय बंद प्लास्टिक पत्रावळींमुळे प्रदूषणात वाढ
जव्हार (वार्ताहर) : पानावर जेवणाची पूर्वापार चालत आलेली परंपरा आता वृक्षतोड, वृक्षसंवर्धन करणे ही स्थिती लोप पावल्याने, कमी मेहनतीने व कमी कष्टात सध्या यंत्रयुगात आमूलाग्र बदल घडून आला आहे. त्यानुसार आता पानांची पत्रावळी दुर्मीळ झाली असून प्लास्टिक पत्रावळींचा वापर लोकप्रिय झाला आहे. यामुळे पर्यावरण समतोल ढासळत चालला असला तरी स्वस्त पर्याय म्हणून लग्न, वाढदिवस, मुंज आणि सार्वजनिक ठिकाणचे भोजन अशा अनेक ठिकाणी स्वस्त पर्याय स्वीकारले जाऊ लागले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील पानांची पत्रावळी बनवणाऱ्या नागरिकांना आपल्या व्यवसायास मुकावे लागत आहे.
आरोग्याच्या दृष्टीने लाभकारक असलेल्या पानांच्या पत्रावळी गायब झाल्या असून त्यांच्याऐवजी प्लास्टिक पत्रावळींना प्राधान्य मिळत आहे. लग्नसमारंभ आणि धार्मिक कार्यक्रमात जेवणासाठी मोहफूल झाडाची किंवा पळसाच्या पानांच्या पत्रावळी वापरत असत. यातून पानाच्या पत्रावळी तयार करणाऱ्या ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असे. मात्र, अलीकडे पळसाच्या पानांच्या पत्रावळीऐवजी प्लास्टिक पत्रावळीचा वापर वाढला असून पूर्णतः पानाच्या पत्रावळी गायब झाल्या आहेत.
प्लास्टिक पत्रावळी घेतल्यामुळे पानांच्या पत्रावळी तयार करणाऱ्यांचा उदरनिर्वाह होण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. आता फक्त पानांच्या पत्रावळीचा उपयोग फक्त देवांना नैवेद्य दाखविण्यासाठीच केला जात आहे.
पानांच्या पत्रावळी तयार करण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू होत असते. जंगल परिसरात जाऊन पळसाच्या झाडाची मोठमोठी पाने तोडून आणल्यानंतर सायंकाळच्या वेळी जेवणानंतर कुटुंब एकत्र येऊन गमतीजमतीच्या चर्चेतून पत्रावळ तयार करत होते. त्यापासून कुटुंबीयांना दोन महिने पत्रावळी व्यवसायातून चांगलाच मोबदला मिळून आर्थिक मदत होत असे. तथापि, आता यंत्रयुगात हाताने तयार करण्यात येणाऱ्या पानाच्या पत्रावळी गायब झाल्या असून प्लास्टिक पत्रावळीने पानाच्या पत्रावळीची जागा घेतली आहे.
पर्यावरणप्रेमी चिंतेत
प्लास्टिक पत्रावळी व द्रोण विघटन होत नसल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. पर्यावरणप्रेमी लोकांना त्याचे अतिशय दुःख होत असून पानांच्या पत्रावळी उपलब्ध झाल्यास त्यांचा आनंदाने स्वीकार करतील; परंतु, काळाच्या ओघात पानांच्या पत्रावळी मिळणे शक्य नाही. कारण प्लास्टिक पत्रावळीचा उपयोग वाढल्यामुळे पानांच्या पत्रावळी तयार करणाऱ्या कुटुंबीयांनी पानांच्या पत्रावळी तयार करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. आरोग्याच्या दृष्टीने पानांच्या पत्रावळी अत्यंत महत्त्वाच्या आहेत हे निसर्गप्रेमी बोलत आहेत.