Monday, January 20, 2025
Homeदेशमहाराष्ट्राचे माजी राज्यपाल के. शंकरनारायणन यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल के. शंकरनारायणन यांचे निधन

त्रिवेंद्रम : महाराष्ट्रासह ६ राज्यांच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळलेले माजी राज्यपाल तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कटीकल शंकरनारायणन यांचे रविवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. केरळ येथील पालघाट येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

शंकरनारायणन यांचा केरळ येथील पलक्कड जिल्ह्यातील शोरनूर येथे जन्म झाला होता. १९७७ मध्ये काँग्रेसकडून ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. १९८५ ते २००१ या १६ वर्षांच्या कालखंडात काँग्रेसकडून त्यांनी यूडीएफ संयोजक म्हणून पदभार सांभाळला. आपल्या कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्रासह एकूण ६ राज्यांच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळला होता. आपल्या निःपक्ष वर्तनातून त्यांनी राज्यपाल पदाची प्रतिष्ठा वाढवली. महाराष्ट्रातील आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी उच्च शिक्षण, मागास भागांचा विकास व आदिवासी विकास या विषयांमध्ये विशेषत्वाने लक्ष घातले होते.

शंकरनारायणन हे प्रामाणिकपणा व सचोटीसाठी परिचित तसेच आदरणीय आणि लोकप्रिय नेते होते. केरळ विधानसभेचे दीर्घ काळ सदस्य राहिलेले शंकरनारायणन हे उत्तम प्रशासकही होते. केरळचे वित्तमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केले होते.

महाराष्ट्रातील योगदान

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची त्यांनी २२ जानेवारी २०१० रोजी शपथ घेतली. नियुक्ती झाल्यावर त्यांनी अल्पावधीतच आपल्या कामाचा ठसा उमटवला. विकास, उच्च शिक्षण, पर्यावरण संरक्षण व लोककल्याण या विषयांवर त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. राज्यातील विद्यापीठांचे कुलपती या नात्याने त्यांनी अवघ्या दीड वर्षांच्या काळात तब्बल १४ कुलगुरूंच्या नियुक्त्या केल्या. या नियुक्त्या राजकीय शिफारशींवरून न होता केवळ गुणवत्तेच्या आधारावर करण्याबाबत ते विशेष आग्रही राहिले. घटनेच्या अनुच्छेद ३७१(२)अंतर्गत राज्यातील वैधानिक विकास मंडळांसंदर्भात प्राप्त अधिकारांचा वापर करून शंकरनारायणन यांनी विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली एका तज्ज्ञ समितीची स्थापना केली असून राज्यातील मागास भागांच्या विकासाच्या पातळ्यांचा नवे मापदंड वापरून तौलनिक अभ्यास करण्याचे काम त्या समितीला देण्यात आले आहे. आपल्या पर्यावरणाविषयक प्रेमाची साक्ष देत शंकरनारायणन यांनी नागपूरमधील राजभवन येथे एक विस्तीर्ण जैववैविध्य उद्यान स्थापन करण्याची सूचना केली असून येत्या काही महिन्यातच त्याचे विधिवत उद्घाटन होणार आहे. या जैववैविध्य उद्यानामध्ये मध्य भारतातील विविध वनस्पतींचे जतन व पुनरुज्जीवन होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -