नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या १५व्या हंगामाचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. बीसीसीआयने ‘प्ले-ऑफ’ फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. बोर्डाने ‘प्ले-ऑफ’ फेरी, दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसह महिला टी-ट्वेन्टी चॅलेंजचा कार्यक्रमही जाहीर केला.
आयपीएल २०२२चे सर्व साखळी सामने मुंबई आणि पुण्यात होणार हे आधीच स्पष्ट होते. मात्र, ‘प्ले-ऑफ’ आणि अंतिम सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. बीसीसीआयने केलेल्या घोषणेनुसार, आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. तसेच ‘प्ले-ऑफ’ आणि इलेमिनेटर सामने अनुक्रमे २४ मे आणि २६ मे रोजी कोलकात्यात होणार आहे. दुसरा ‘प्ले-ऑफ’ सामना २७ मे रोजी अहमदाबादमध्ये होईल.
बीसीसीआयने वुमेन्स टी-ट्वेन्टी चॅलेंज सामन्यांचीही घोषणा केली. यंदा तीन संघांमधील चॅलेंजच्या आयोजनाची संधी उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनला मिळणार आहे. ट्रेल ब्लेजर्स, सुपरनोवाज् आणि व्हेलॉसिटीमधील हे सामने लखनऊमध्ये खेळले जाणार आहेत. सध्या सुरू असलेल्या वुमेन्स टी-ट्वेन्टी चॅलेंज ट्रॉफी संपल्यानंतर मे महिन्यात तिन्ही संघाची निवड केली जाणार आहे.
बीसीसीआयने भारत आणि दक्षिण अफ्रिकेमधील पाच सामन्यांच्या टी-ट्वेन्टी मालिकेचीही घोषणा केली. त्यातील पहिला सामना (९ जून) दिल्लीमध्ये होईल. त्यानंतर दुसरा सामना (१२ जून) कटकमध्ये, तिसरा सामना (१४ जून) विझागमध्ये, चौथा सामना (१७ जून) तसेच पाचवा आणि अंतिम सामना (१९ जून) बंगळूरुमध्ये रंगेल.