पुणे (हिं.स.) : आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२२ या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्या रथातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. त्या रथाला बैलजोडीचा मान आळंदी येथील प्रगतशील शेतकरी पांडुरंग वरखडे यांना मिळाला आहे. दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा प्रातिनिधीक स्वरुपात मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत एसटी महामंडळाच्या बसने पार पडला गेला.
यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पालखी सोहळा पायी जाणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा २१ जुन रोजी होणार आहे. त्याच अनुषंगाने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बैलजोडी समिती सदस्यांच्या झालेल्या सभेत रोटेशन नुसार एकमताने आळंदीतील पांडुरंग वरखडे यांच्या कुटुंबाला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील बैलजोडीचा मान देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
यावेळी विश्वस्त अभय टिळक, बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, सदस्य शिवाजीराव रानवडे, विलास घुंडरे, रामदास भोसले, नंदकुमार कुऱ्हाडे, माऊली वहीले, रमेश कुऱ्हाडे, पांडुरंग वरखडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते.