मुंबई (प्रतिनिधी) : “ही राजकीय लढाई राहिलीच नाहीये. इथे गँगवॉर सुरू झाला आहे. अघोषित गँगवॉर आहे हा. तुम्हाला दाऊद, छोटा शकील या लोकांना बाहेर काढायचे होते. आता शिवसेनेच्या निमित्ताने तुम्हाला मुंबईत गँगवॉर सुरू करायचेय का? आणि आम्ही काय बघत बसायचे का? असा सवाल करत, चालणार नाही”, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे?
आमदार नितेश राणे यांनी या सर्व घडामोडींवर प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला. शनिवारी राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्यापासून माघार घेतल्यावर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर खार पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक झाली.
ते म्हणाले, आज रस्त्यावरची लढाई सुरू झाली आहे. खार पोलीस स्टेशनसमोर काँक्रीटची वीट सोमय्यांवर टाकली जाते. तर पोलीस काय करत होते. उद्या शिवसेनेच्या दिशेने, वरुण सरदेसाईंच्या दिशेने, आदित्य ठाकरेंच्या दिशेने दगड यायला लागले, तर काय करणार तुम्ही? आम्ही विचारांची लढाई विचारांनी लढू. दगडाची भाषा दगडाने करू, पण आम्हाला राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची नाहीये. असेही राणे म्हणाले.