Tuesday, December 3, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेशहापूरमधील पाणीटंचाई सोडविण्यासाठी अमृतकुंभ, मोती, बोडद धरणांची मागणी...

शहापूरमधील पाणीटंचाई सोडविण्यासाठी अमृतकुंभ, मोती, बोडद धरणांची मागणी…

आमदार डावखरे यांचे कपिल पाटील, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ठाणे( प्रतिनिधी): शहापूर तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई सोडण्यासाठी अनेक वर्षांपासून रखडलेले घाटनदेवी येथील अमृतकुंभ जलसागर धरण, बेंडेकोन येथील मोती लघु धरण आणि पेंढरी कलमगाव येथील बोडद लघु धरण उभारावे, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील व जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे. या मागणीवर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

मुंबई-ठाणे शहराची तहान भागविणारा तालुका म्हणून शहापूरची ओळख आहे. शहापूर तालुक्यातच भातसा, तानसा आणि मोडकसागर धरणे आहेत. मात्र, तालुक्याचा खर्डी परिसर, वाशाळा, तलवाडा-डोळखांब, कसारा-मोखावणे, आटगाव, कळमगाव, पेंढरघोळ, किन्हवली आदी परिसरासह तालुक्यातील ग्रामीण भागाला दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

गेल्या अनेक वर्षांपासून शहापूर तालुक्यात घाटनदेवी येथील अमृतकुंभ जलसागर धरण, बेंडेकोन येथील मोती लघु धरण आणि पेंढरी कलमगाव येथील बोडद लघु धरण उभारण्याची मागणी केली जात आहे. मात्र, त्याबाबत सरकारी यंत्रणांकडून दखल घेण्यात आलेली नाही, असे आमदार डावखरे यांनी पत्रात म्हटले आहे. यावेळी भाजपाचे गटनेते विवेक नार्वेकर यांचीही उपस्थिती होती.

शहापूरात उत्तरेकडील दक्षिण बाजूला आणि कसारा घाट रस्त्याच्या डावीकडील खोऱ्यात पाच ते सात दऱ्यांमध्ये अमृतकुंभ जलसागर धरण उभारता येऊ शकेल. प्रस्तावित धरणाचा परिसर शहापूर तालुक्याच्या २०० ते ५०० मीटर उंच भूभागावर असल्यामुळे गुरुत्वाकर्षण पद्धतीने गावांना सहजपणे पाणीपुरवठा करता येऊ शकेल. प्रस्तावित अमृतकुंभ धरण क्षेत्रातील जमीन वन विभागाच्या मालकीची असून, धरणाच्या परिसरात एकही गाव वसलेले नाही. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्नही निर्माण होणार नाही.

अमृतकुंभबरोबरच मोती व बोडद लघु धरणही उभारता येणे शक्य आहे. तालुक्यात दरवर्षी होणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी तिन्ही धरण उभारण्याची आवश्यकता आहे, असे आमदार डावखरे यांनी पत्रात म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -