मुंबई (प्रतिनिधी) : ‘झुकेगा नहीं साला’ म्हणत राणा दाम्पत्याला इशारा देणाऱ्या मुंबईतील ९२ वर्षीय आजीबाईंच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी सहकुटुंब सरळ परळला त्यांच्या घरी गेले. यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागा शिंदे या आजींची परळमधील दाभोळकर वाडीत त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. तसेच तुम्हीही आमच्या घरी यायचे, असे आमंत्रण दिले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असताना मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमाला गैरहजर राहत आजींची भेट घेतली.
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर शिवसेना कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले. मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी राणा दाम्पत्याने थेट मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अनेक शिवसैनिकांसह ९२ वर्षांच्या चंद्रभागा आजी देखील मातोश्रीबाहेर थांबल्या. तसेच त्यांनी थेट राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी करत ‘पुष्पा’ स्टाइलमध्ये ‘झुकेगा नहीं साला’ म्हणत इशारा दिला होता.
ठाकरे यांची दांडी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी षण्मुखानंद येथील लता मंगेशकर पुरस्कार वितरण या कार्यक्रमाला रविवारी दांडी मारली. त्यांच्या अनुपस्थितीत राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे तेथे उपस्थित असायला हवे होते; परंतु सरकारचा प्रतिनिधी म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र विमानतळावर पंतप्रधानांच्या स्वागताला सुभाष देसाई यांच्याबरोबर राजशिष्ठाचार मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.