Friday, May 9, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे पुण्यात निधन

माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे पुण्यात निधन

पुणे : माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. प्रशासकीय कारकीर्दीसोबतच विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण लेखनासाठी ओळखल्या जाणाऱ्या गोडबोले यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.


माधव गोडबोले यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ्या पदांवर काम केले. प्रशासकीय सेवेतील निवृत्तीनंतरही ते कायम सक्रीय होते. विविध वृत्तपत्रांतील स्तंभलेखनाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रशासकीय अनुभव जनसामान्यांसमोर मांडले. तसंच प्रशासकीय सेवेत दाखल होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठीही गोडबोले यांनी केलेलं लेखन मार्गदर्शक ठरले आहे. त्यामुळे त्यांच्या निधनाने सर्वच स्तरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


डॉ. माधव गोडबोले यांचा जन्म १५ ऑगस्ट १९३६ रोजी झाला. गोडबोले यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून विकासाचे अर्थशास्त्र या विषयात एम.ए. आणि पीएच्‌.डी. या पदव्या मिळवल्या. १९५९ साली त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला आणि मार्च १९९३ मध्ये केंद्रीय गृहसचिव आणि न्यायसचिव असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव व नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहिले होते. तसंच त्याअगोदर डॉ. गोडबोले यांनी महाराष्ट्र शासनात मुख्य वित्तसचिव म्हणूनही काम केले होते.

Comments
Add Comment