Friday, May 9, 2025

कोलाज

आपल्या सवयी आपल्या हाती...

आपल्या सवयी आपल्या हाती...

मृणालिनी कुलकर्णी


यशस्वी जीवन जगण्यासाठी चांगल्या सवयी जोपासणं हे शेत नांगरण्यासारखं आहे. त्यासाठी वेळ लागतो. पण आतून प्रेरणा मिळताच ती गोष्ट करायला आपण सुरुवात करतो, अंतःप्रेरणेने चालू ठेवतो तीच सवय! बालकांना १६ वर्षांच्या आत चांगल्या सवयींसाठी चांगल्या मूल्यांची, कर्तृत्ववान व्यक्तींची पुस्तके, मुलांना बाहेर नेऊन स्थळे- कलाक्रीडाचा प्रत्यक्ष अनुभव असा सकारात्मक खाद्याच्या बिया पेरल्यास योग्य वयात गुणांनी बाग फुललेली दिसेल.


पालकांचे दोन अनुभव -


१. शिक्षणासोबत आपल्या दोन पाल्यांचा कला प्रशिक्षणाचा खर्च मला झेपणारा नव्हता. न पाठविल्यास मुलांचा तो वेळ मोबाइल, चॅटिंग, संगत... कुठल्याही अशा आकर्षणात अडकण्यापेक्षा गुंतलेला बरा.


२. पाळणाघरातील बंद खोलीपेक्षा दुपारच्या क्रिकेट कोचिंगला पाठविले. मुलगाही खूश. खेळामुळे तो सशक्त होऊन, भिन्न भिन्न मित्रांमुळे, गुणात्मक सवयीत चांगलाच बदल झाला.


पालकांनो, प्रत्येक गोष्ट मुलांच्या हाती देऊन त्यांना पंगुत्वाची सवय लावू नका. पिंजऱ्यातला पोपट बाहेर उडाला, तेव्हा त्याच्या पंखात उडण्याची, खाण्यासाठी धडपड करण्याची, पोपट मित्रांशीच बोलण्याचीही सवय नसल्याने शेवटी उपवासाने मेला. ट्रेकर्स, खेळाडू स्वतःचे किट स्वतः उचलतात. ही सवय पेरा. थोडीशी विश्रांती यात गजराचे बटण बंदच राहते.


सुखवस्तू घरातील नवज्योत सिंगला वडील रोज सकाळी धावण्याच्या सरावासाठी उठवत होते, पण उपयोग झाला नाही. १९८३ साली संघातून काढल्यानंतर, “निर्धावी चमत्कार’ वर्तमानतपत्रातील टीकेने नवज्योत सिंगची झोप उडाली. एक स्फुल्लिंग मनात चेतवले गेले. कसून मेहनतीने पुन्हा १९८७ वनडे क्रिकेटच्या वर्ल्डकपमध्ये संधी मिळवली.


मार्गदर्शक नेहमी सांगतात, रियाझ सोडू नका, सराव करा, प्रयत्नात मागे पडू नका, सातत्य ठेवा या साऱ्या क्रियेतूनच सवय अंगी बाणते. आपल्या वर्तणुकीत ४५% भाग मनात खोलवर रुजलेल्या सवयीचाच असतो. त्याच सवयी आपल्याला पुढे नेण्यास किंवा रोखण्यास मदत करतात. प्रतिकूल परिस्थितीत ध्येर्य दाखविणे, मोहाच्या क्षणी मनावर ताबा ठेवणे, निराशाजनक परिस्थितीत शांत राहणे, संकटातून मार्ग काढणे हे योगायोग नव्हे, बऱ्याच वर्षांच्या चांगल्या सवयीचा नित्कर्ष किंवा गुण आहे. सवय म्हणजे स्वतःचे स्वतःला लावून घेतलेले वळण. सवयीचे प्रतिबिंब म्हणजे व्यक्तिमत्त्व! नित्याच्या सवयी ही एक सहजप्रवृत्ती आहे. आपल्या मज्जासंस्थेला एकतर्फी वाहतुकीची सवय लागलेली असते. जे आवडते तिकडे ओढ घेते. खरेदीच्या वेळी नव्या नव्या आकर्षणाने कळण्यापूर्वीच खिशातून पैसे निघतात. जे आवडत नाही त्यापासून दूर जातो. याचाच अर्थ आपल्या सवयीच आपले आयुष्य बदलवतात. त्यासाठी योग्य विचार करण्याची सवय लावून घेणं गरजेचे असते. विचारातून कृती होते. कृतीतून सवय सापडते. सवयीतून चारित्र्य घडते.


परिवर्तनासाठी काही सवयी बदलूया. ज्येष्ठ वयात तंत्रज्ञान शिकूनही विसरतो म्हणून ते वापरत नाही. आपणच स्वतःभोवती चौकट आखतो. मी विसरते/भीती वाटते, मला हे जमणार नाही/शोभणार नाही/आवडत नाही. नवीन बदल पटकन मन स्वीकारत नाही. कारण जिभेला/हाताला /मनाला/शरीराला सवय नसते. हे सारे नकार (सवयी) स्थिर मनाने बदलून नव्या पिढीत सामील होऊया.


गृहिणीचे व्यवस्थापन कौशल्य वाखाण्याजोग! कुठलीही वस्तू जागेवर मिळणारच, घरात वस्तू संपायच्या आत हजर. तिन्हीसांजेला दिवा लावणे… अनेक वर्षांनुवर्षांच्या सवयी! रोज रात्री जमा-खर्च आणि रोजनिशी लिहिताना ती स्वतःशीच संवाद साधते. आता मास्क, सॅनिटाझरच्या सवयीला रुळलोच ना? वर्गात विद्यार्थी दिसल्याशिवाय, श्रोते असल्याशिवाय शिकवायला/भाषाणाला मजा येत नाही, ही जडलेली सवय. ऑनलाइन कसे जमेल म्हणता म्हणता सवय झाली ना! तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचे असेल, तर आपल्या प्रवासात मदत होतील अशा नव्या
सवयी ओळखून शरीर-मनाला लागणे गरजेचे आहे. जन्मजात साऱ्या क्षमता कुणाकडेच नसतात.


सवयींचे विभाजन करताना


१. प्रगतीच्या आड येणाऱ्या (नकारात्मकतेकडे झुकणाऱ्या)


२. प्रगतीकडे नेणाऱ्या (मला जमेल, मी करणार, सकारात्मकतेकडे जाणाऱ्या) सवयी प्रथम एका कागदावर लिहून काढा.


सवयीचा गुणविशेष असा : कोणत्याही वयात, मनाच्या इच्छाशक्तीवर सवयी बदलता येतात. एकाने सिगारेटला पर्याय म्हणून मॅरेथॉनसाठी धावणे सुरू केले. व्यसनाला किंवा वाईट सवयींना पर्याय : मुक्तांगणसारख्या संस्था, डोंगर चढणे, छंद, आध्यात्म….


समाजात सर्वांना बदल, स्वच्छता हवी असते ती फक्त दुसऱ्याकडून. कचरा बाहेर टाकणे, थुंकणे, माझ्या एका प्लास्टिकच्या पिशवीने काय होते? छोट्या-छोट्या दिसणाऱ्या बिनमहत्त्वाच्या वाटणाऱ्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात महत्त्वाच्या असून त्या सवयीने बदलू शकतो. स्टिफन कोवे यांचे ‘यशस्वी लोकांच्या सात सवयी’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. थोर लोकांच्या कार्यपद्धती शिका. जे. के. रोलिंग म्हणतात, “जेवढे वाचता येईल तेवढे वाचा, नकारात्मक विचारापासून दूर राहाल.” आयझॅक न्युटन म्हणतो, “माणूस काय काय काम करतात आणि मोकळ्या वेळात कुठली कामे करतात याचा अभ्यास करा.” हेनरी फोर्ड यांची एकाग्रता, वक्तशीरपणा. महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांनी आपल्या जीवनात अगोदर स्वतःला काही सवयी लावून घेतल्या. नंतर त्या सवयीनुसार वागले. चांगले वर्तन, चांगली वागणूक समाजात प्रतिष्ठा मिळवून देते. बरीच उदाहरणे आहेत. मुलाखतीत मार्कांपेक्षा युवकांची वागणूक पाहतात.


वेळेचे नियोजन, कामाची आखणी, अंदाज बांधण्याची सवय, दुसऱ्याचे ऐकून घेणे, शांत राहणे या सवयी यशाकडे वाटचाल करताना महत्त्वाच्या ठरतात. सवयीने काम सहजतेने, सुलभतेने अचूकतेने पार पडते. संकल्प करा, पालन करा. शिस्तीने २१ दिवस सराव करा. ‘आपल्या सवयी आपल्या हाती’ - “फक्त एक अंश अजून” (म्हणजेच जास्तीचे कष्ट) ही यशस्वी माणसांची सवय अंगी बाणा आणि चमत्कार अनुभवा.


डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा प्रसिद्ध कोट -
“You can not change your future; but, you can change your habits And surely, your habits will change your future...”


[email protected]

Comments
Add Comment