Saturday, March 15, 2025
Homeक्रीडावानखेडे स्टेडियम लकी ठरेल?

वानखेडे स्टेडियम लकी ठरेल?

मुंबई आज लखनऊशी भिडणार

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएल २०२२ हंगामाच्या ‘संडे स्पेशल’ सामन्यात (२४ एप्रिल) माजी विजेता मुंबई इंडियन्सची गाठ लखनऊ सुपर जायंट्सशी पडेल. रोहित शर्मा आणि सहकाऱ्यांना सात सामन्यानंतरही पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वानखेडे स्टेडियमवर त्यांना सूर गवसेल का, याची चाहत्यांना उत्कंठा लागून राहिली आहे.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यांना एका मागोमाग सात पराभव पाहावे लागलेत. त्यामुळे रोहित शर्मा आणि कंपनीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र अपयश विसरून मुंबईची सांघिक कामगिरी बहरेल, असा विश्वास चाहत्यांना वाटतो. त्यामुळे लखनऊविरुद्ध अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान मुंबईच्या क्रिकेटपटूंसमोर आहे.

मुंबईची कामगिरी सर्व आघाड्यांवर ढेपाळली आहे. आघाडीच्या फळीतील इशान किशन, सूर्यकुमार यादव तसेच तिलक वर्माने (प्रत्येकी २ अर्धशतके) थोडी फार चांगली बॅटिंग केली तरी सातत्य नाही. कर्णधार रोहित शर्मा (७ सामन्यांत ११४ धावा), कीरॉन पोलार्ड (७ सामन्यांत ९६ धावा) या अनुभवींसह नवोदित डीवॉल्ड ब्रेविस (७ सामन्यांत १२१ धावा) यांचा खराब खेळ पराभवाला कारणीभूत ठरत आहे. गोलंदाजीतही आलबेल नाही. अनुभवी मध्यमगती गोलंदाज जसप्रीत बुमरासह जयदेव उनाडकट, टायमल मिल्स, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन हे प्रमुख गोलंदाज अद्याप फॉर्मसाठी झगडताहेत. त्यामुळे गुणांचे खाते उघडायचे असेलम तर मुंबईच्या प्रमुख बॅटर्ससह बॉलर्सना सांघिक खेळ उंचावण्यासाठी भरीव योगदान द्यावे लागेल.

लखनऊ सुपर जायंट्सनी ७ सामन्यांत ४ विजयांसह ८ गुणांनिशी आयपीएल २०२२च्या गुणतालिकेत अव्वल चार संघांत स्थान राखले आहे. राजस्थान रॉयल्सनंतर गुजरात टायटन्स आणि बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सप्रमाणे त्यांनाही गुणसंख्या दोन आकडी (डबल डिजिट) करण्याची संधी आहे. मात्र मागील लढतीत त्यांना बंगळूरुकडून मात खावी लागली आहे. मुंबईच्या ढेपाळलेल्या कामगिरीचा कितपत फायदा उठवतात, यावर त्यांचे यशापयश अवलंबून आहे. लखनऊची भिस्त कर्णधार लोकेश राहुलसह क्विंटन डी कॉक तसेच दीपक हुडावर आहे. मात्र मनीष पांडे, कृणाल पंड्याला अद्याप सूर गवसलेला नाही. मध्यमगती अवेश खानसह जेसन होल्डरने थोडा फार प्रभावी मारा केला तरी लेगस्पिनर रवी बिश्नोई, दुशमंत चमीरा, कृणाल यांनी निराशा केली आहे. त्यामुळे गुणतालिका पाहता राहुल आणि सहकाऱ्यांचे पारडे जड असले तरी त्यांना प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखून चालणार नाही.

वेळ : रा. ७.३० वा. ठिकाण : वानखेडे स्टेडियम

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -