
डॉ. स्वप्नजा मोहिते
आज सकाळ झाली की, माझा मोबाइल वाजायला सुरुवात होते. मग तो तसाच कितीतरी वेळ मेसेजेसची नोटिफिकेशन्स वाजवत राहतो. सकाळपासून येणारे गुड मॉर्निंगचे मेसेजेस! कधी नुसतेच शब्दांचे, काही देवादिकांपासून... दंव भरल्या फुलांच्या फोटोजनी सजलेले... काही हसऱ्या गोड बाळांचे... काही असेच, त्या गुड मॉर्निंगच्या मेसेजेसशी संबंध नसलेल्या आकृत्यांनी, फोटोजनी नटलेले! हल्ली मला या मेसेजेसची भीतीच वाटायला लागली आहे. ते वाचायचे आणि त्यांना परत उत्तरं पाठवायची! नेट एटिकेट्स म्हणे! हा मोबाइल येण्यापूर्वी कुठे होते हे नेट एटिकेट्स? आणि सकाळी उठून ‘कराग्रे वसते लक्ष्मी...’ म्हणणारे कुठे म्हणत होते गुड मॉर्निंग? कोण कोण हे शुभ प्रभात... शुभ दुपार... (शुभ संध्याकाळ ही!) मेसेजेस पाठवत राहतात. आला संदेश की ढकल पुढच्या ग्रुपमध्ये! यात खरा संवाद सुटत चाललाय आपल्यातला... असं वाटायला लागलंय मला.
आता संवाद हरवत चाललाय मन-मनांतला
शब्दांचे पोकळ बुडबुडे स्क्रीनवर उमटतात
भावनाशून्य, अर्थशून्यसे,
वाचून डिलिट करून टाकले
की नाहीच उरत काही ठसे!
भिडत नाहीत मनाला आता
शब्दांच्या या पोकळ ओळी
नाती आता केव्हाच हरवली आहेत
आणि संपली आहे ओल मनातली, केव्हाच...
आम्ही सांभाळत मात्र बसलोय...
पोकळी एक, खिन्न एकल्या मनातली!!
मोबाइलवर असंख्य संदेश उमटतात. समोरचा माणूस एकमेकांशी बोलण्याऐवजी बुडून गेलेला असतो आपल्या मोबाइलच्या व्हर्चुअल जगात! अक्षरांवरून फिरत असतात त्याची बोटं! अरे बाजूला बसलेल्याचा हात जरा हातात घे. तुझ्या स्पर्शाची इवलीशी सावलीही पुरेशी होईल त्याला! स्क्रीनवरली ती भावनाशून्य अक्षरं वाचण्याऐवजी, प्रयत्न कर बाजूला बसलेल्याचं मन वाचण्याचा. असंख्य वादळं सुरू असतील मनात त्याच्या! बघ सोबत करता येतेय का एखाद्या तरी वादळात त्याला! कुठून तरी, कोणी तरी पाठवलेल्या छायाचित्रात, पापणीवर थरथरणाऱ्या आसवांचं चित्र भावलंय ना तुला? समोर अख्खं आसवांचं झाड ओथंबून आलंय... दिसलंय कधी तुला? आलेल्या पोस्टमध्ये खूप काही इमोशनल लिहिलंय... लगेच त्याला लाइक देऊन मोकळे झालात तुम्ही! आयुष्याची साथ देण्याची वचने दिलेली आहेत कुणी सोबत तुमच्या... तिच्यातल्या इमोशन्सचे उतार-चढाव टिपलेत कधी तुम्ही? पहाटेपासून येणाऱ्या फिलॉसॉफीभऱ्या संदेशाने भारावलात ना तुम्ही? जिंदगीतल्या प्रत्येक पावलावर स्वतःची फिलॉसॉफी स्वतः बनवणाऱ्याला ओळखलंत कधी?
मला खरंच हल्ली मोबाइलची भीतीच वाटायला लागली आहे. एखाद्या जन्माचं स्वागत करताना ठरलेलं आयकॉन्स इमोटिकॉन्स टाकायचे आणि कुणाचा मृत्यू झाल्याचं कळलं की RIP म्हणायचं... किती सहज सोपं! त्या नव्या जीवाचं स्वागत करताना, तो निखळ आनंद आता मनापासून शेअर होत नाही आणि एखाद्याच्या मृत्यूमुळे कोणाच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी, आता आपल्याला जाणवत नाही. हल्ली शब्द शोधावे लागतात टाइप करण्यासाठी... यांत्रिकपणे उमटतात ते त्या स्क्रीनवर... इप्सित स्थळी पोहोचल्याची निळी खूण उमटली की, आपला संदेश पोहोचल्याचं क्षणिक समाधान पांघरून, आपण दुसऱ्या संदेशाकडे वळतो. नवा संदेश... असंख्य ग्रुप्स... तेच ते संदेश परत परत इकडून तिकडे ढकलले जातात. RIPच्या संदेशाखाली कुठला तरी जोकचा संदेश उमटतो. चलता हैं यार! हू केअर्स? आपण आपल्या मोबाइलमधले संदेश डिलीट केले की, झालं... आपली पाटी कोरी... परत पुढच्या संदेशाची वाट पाहायला! ना कसलं सोयरं, ना सुतक!
आता संकष्टी चतुर्थीचाही ‘हॅप्पी संकष्टी चतुर्थी’ म्हणून संदेश येतो आणि ‘हॅप्पी रक्षाबंधन’, हॅप्पी इंडिपेन्डन्स डे’ अशा संदेशांची माळ उमटत राहते. हे दिवस पूर्वी हॅप्पी नव्हते का? मी उगाच विचार करत बसते. हे असे संदेश मी परत ‘पास इट ऑन, दे विल रिटर्न’ करायचे का? मला कळत नाही. ‘शिष्ट आहे ती’चा शिक्का तेव्हा माझ्यावर मारला जातो. मला कळतं पण तरीही वळत नाही. नेट एटिकेट्सची पार वाट लागते माझ्याबाबतीत. हळूहळू येणारे संदेश कमी होतात... तेव्हा माझ्याकडे वेळच वेळ असतो. अगदी अर्जंट असेल तर, गरज असेल तर मी उत्तर देणार हे काहीजणांना कळतं... बऱ्याच जणांना नाही...
मग मी तेव्हा शोधत राहते बोलण्यासाठी माणसं! मला नव्या वाचलेल्या पुस्तकाबद्दल सांगायचं असतं. पावसात भिजत येताना किती मजा आली ते शेअर करायचं असतं! भक्ती बर्वेचं ‘ती फुलराणी’मधलं स्वगत ऐकवायचं असतं. नाहीतर जगजीत सिंगची दर्दभऱ्या स्वरातली गझल ऐकायची असते कोणाला तरी सोबत घेऊन! झिरमिरत्या पावसाला सामोरे ठेवून वाफाळत्या कॉफीचा स्वाद नव्याने अनुभवायचा असतो. अगदीच काही नाही तर ‘रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन...’मधल्या दृश्यागत भिजायचं असतं कोणाच्या तरी सोबतीने! कधी कधी तर नुसतंच असावं कुणीतरी बरोबर आणि सभोवार पसरलेली शांतता पांघरून घ्यावी अंगाखांद्यावर असंही वाटतं! पण तेव्हा कोणीच नसतं... समोर असूनही प्रत्येकजण आपापल्या अदृश्य व्हर्चुअल बेटावर... या जगाला विसरून! मी बघत राहते त्यांच्याकडे... शोधत राहते त्यांच्या या जगातल्या खुणा! हातातून वाळू निसटून जावी तसं त्यांचं अस्तित्व हरवून जातं मोबाइलच्या जगात! मला तिथे जागा नसते. किंबहुना मी नसतेच त्या व्हर्चुअल जगात!
तिथे त्यांचे व्हर्चुअल मित्र-मैत्रिणी असतात... प्रेमाचे, सांत्वनाचे, सुख-दुःखाचे पोकळ शब्द आणि हसण्या रचण्याचे इमोटिकॉन्स, साइन लँग्वेजमधल्या खुणा असतात त्यांच्याबरोबर... ते हसतात... दुःखाचं प्रदर्शन करतात... जुना गाण्यावर नॉस्टॅल्जिक होतात. नवीन काहीबाही डाऊनलोड करत राहतात. ‘पास इट ऑन... इट विल रिटर्न अगेन’ हा मंत्रा आहे इथला! इथे मनाला थारा नाही... खऱ्या आसवांना जागा नाही आणि भावना... अरेच्चा! हे काय असतं? इथे रडणाऱ्याला सहारा देणारा खांदा नाही आणि पडणाऱ्याला सावरणारा हातही नाही! “ओ टेक केअर... वी आर विथ यू...” म्हटलं की काम झालं. आय लव यू म्हणून बदामाचं चिन्ह टाकलं की... बहुत कह दिया म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायची. हळूहळू आपण बोलणं विसरत चाललोय का? मला आता म्हणूनच मोबाइलची भीती वाटायला लागली आहे.
उन दिनों दरवाजे खुले रखते थे हम
रिश्तो की महक तब, खिडकियोंसे से भी आती थी
हाथों को तब सहारा देना आता था और
छलकते आँसू पल्लू से पोछा करते थे हम
रात के अंधेरे मे चांदनी घुलती थी
और बचपन की कहानी लिखी जाती थी
जिंदगी की लकीरें, लकीरों से मिला करती थी
गुम हुए उन दिनों को ढुंढते हैं हम
एे जिंदगी तेरी रफ्तार में
ये कहाँ आ गये हैं हम??
सगळे हरवत चाललेत का? की मीच हरवते आहे? की भावनांचे कल्लोळ... त्यांच्याशी आपलं असलेलं नातं... नकोच आहे आता? की एकमेकांशी बोलायचीच भीती वाटतेय आता आपल्याला? एकमेकांना समजून घेणं... शेअर करणं आणि शेअर होणं नकोच? मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसायचं... पक्षी जसा बसतो आपल्याच पंखात मान खुपसून तसा! बाजूला बसलेल्याशी बोलणं नकोच आणि त्यात गुंतणंही नकोच! हे बरंय आपलं... वाचलं नि सोडून दिलं... डिलीट केलं की संपलं! अशी मनाची पाटी कोरी करता आली, तर किती बरं होईल ना? नव्या दिवसांचा नवा संदेश... नवा मेसेज! असा रोज मन कोरं करून घेतलेला माणूस भेटला पाहिजे ना? नो इमोशन्स... नो वरीज! हाय... गुड मॉर्निंग... लेट अस स्टार्ट अ न्यू रिलेशनशिप! अरे पण सॉरी... रिलेशन म्हटलं की परत गुंतणं आलं! काय नाव द्यावं याला मग या आभासी जगात? व्हर्च्युअल सोल-मेट? असे व्हर्च्युअल सोल-मेट्स बसलेत माझ्या आसपास! मी हाडामांसाचा खराखुरा सोलमेट शोधतेय! मोबाइलच्या जगाची मला आता खरंच भीती वाटते!!!