डॉ. पल्लवी परुळेकर – बनसोडे
‘त्या निष्ठुर स्पर्शांनी
माझं बालपण मला सोडून गेलं..
आणि जाताना नवीन नराधमांशी..
नातं माझं जोडून गेलं…’
ती नुसतं बोलत होती… सुन्न करणारं सारं… स्त्री म्हणून जन्माला आली याचा विटाळ वाटावा, इतकं किळसवाणं आयुष्य…
वयाच्या बाराव्या वर्षी ओरबाडलं होतं तिला. त्यानंतर ती खूप मोठी होत गेली… मनाने आणि शरीरानेही… त्या निष्ठुर स्पर्शाला काय म्हणतात, ही जाणीव नसताना केवळ जखमा करणारा पुरुष ही धारणा त्याच वेळी मनात आकार घेऊ लागली. जरा कुणी खांद्यावर हात टाकला तरी ती दचकायची. इतकी भीती आणि मी तिच्या भीतीभोवती माझे प्रश्न घेऊन फिरत होते…
आता ती बरीच मोठी झालीय. तसं तिच्या-माझ्यात फारसं अंतर नव्हतं, पण मला ती जशी कळू लागली तितकी मी तिच्यात अधिक गुंतत गेले. आमची मैत्री सँडहर्स्ट रोडच्या चाळीतली. साधी वन रूमच. त्या खोलीतच हॉल, बेड, किचन ही कन्सेप्ट. पण ‘घर’ म्हणावं असं सारंच तिथे. मधले खांब नव्हते, चार भिंतींना जोडलेली ती वास्तू. पण त्यात सारं कसं एकमेकांना बांधलेलं. ती समोरच्या बिल्डिंगमध्ये राहायची.
आमच्या बिल्डिंगखाली एक इराणी हॉटेल होतं. पूर्वी फार गर्दी असायची. आम्हीही जायचो. कोल्डड्रिंकच्या बाटल्यांची बुचं गोळा करायला. त्यातल्या स्टिकरवर बक्षीस असायचं. ते जिंकण्याची ईर्ष्या वेगळ्याच वाटेला घेऊन गेली. ज्या वाटेला नंतर वळणच मिळालं नाही. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या त्या दादाने तिला बिल्ल्याचं आमिष दाखवून घरात नेलं. दरवाजा लावून त्याने स्वतःचं नागवेपण दाखविण्याआधीच ती जोरजोरात किंचाळली. आम्ही बाहेरच होतो. त्यानेही घाबरून दरवाजा उघडला. पण ती खूप घाबरली होती. काहीच बोलायला तयार नव्हती. ‘त्याने मला पकडलं…’ इतकंच बडबडत होती. तिला काही सांगता येत नव्हतं. काय आणखीन काही झालं होतं, कोण जाणे. पण नंतर नंतर ती खूपच अलिप्त राहू लागली. जणू काय शिवाशिव झालीय. पहिल्या मजल्यावर यायलाही ती
बिथरत होती… तिचं अवखळ हसणं, मुलांसारखं बिनधास्त वागणं, चप्पीपासच्या खेळात रमणं, पाच तीन दोनचा पत्त्यांचा डाव, सारं संपलं… आम्ही पानं पिसत गेलो आणि ती डावच विसरली. सारं कसं शांत होत गेलं… मी मात्र त्या वयातही तिचाच विचार करीत होते. येता-जाता तिचं हरवलेपण मला बरंच काही शिकवून गेलं आणि मीही तिच्या नजरेतून ‘पुरुष’ या शब्दाचा अर्थ शोधत गेले…
गच्चीवर आम्ही खेळत असताना ती काहीतरी लिहीत बसायची. खूप अवजड शब्द… त्यानंतर साधारण दीड-दोन वर्षं सरली. मी शाळेची तयारी करून निघणार तोच जोरजोरात किंचाळ्या, आवाज मनाला चिरून गेला. रस्त्यामधली गर्दी एकमेकांना धक्के मारून जाताना कळलं की, तिने गॅलरीतून उडी मारली. रक्ताच्या थारोळ्यातली ती कायमची शांत झाली…
कुणाचं रडणं, आक्रोशही न ऐकू यावा इतकी मीही शांत झाले. माझंही बालपण तिच्यासोबत संपलं… स्वतःला जपणं सुरू झालं. कपड्यांपासून ते ढोपराखालचे उघडे पायही कसे सॉक्सने झाकता येतील अशा बारीकसारीक गोष्टींना संस्कार या नावाखाली माझे घरचे मिरवू लागले. पण मी काय जपत होते ते मलाच ठाऊक. कारण गच्चीवर त्या बोळात तिने लिहिलेली सारी पत्रं मला सापडली. आश्चर्य एवढंच होतं, सारं तिने मला लिहिलं होतं.
जिच्या प्रश्नांभोवती मी फिरत होते, त्या प्रश्नांची उत्तरं ती मलाच देत होती. कदाचित लिहिण्यात न गुंतता ती माझ्याशी बोलली असती तर…
नुकतीच मोठी झाली होती ती. बाई म्हणून नकळत्या जाणिवेचा तो प्रवास सुरू न झाला तोच हा प्रसंग. तिच्यासाठी या दोन्ही गोष्टी पाहुण्यांसारख्या… तिच्यात एक बाईपण आकार घेत होतं आणि सुरू होण्याआधीच तिने स्वतःला संपवलं. शांभवीने असं का केलं? याची उत्तरं आता फक्त माझ्याकडे होती. मीही माझ्यातल्या पाहुणीला स्वीकारलं. ती जाणीव मला मोठं करत गेली. तिच्या प्रत्येक पत्रातून मी का आणि काय जपलं पाहिजे, हेच स्पष्ट होत गेलं आणि मी तिला follow करत गेले. तरीही समाजाच्या चौकटीत न बसणारं आयुष्य माझ्याही वाट्याला आलं.
तिच्या, माझ्या आणि अशा अनेकजणींच्या स्त्रीत्वाला काय नाव द्यावं…? तिची पत्रं या स्त्रीत्वाला अपंग करून टाकतात…