Tuesday, July 16, 2024
Homeसाप्ताहिककोलाज“आज नई मंज़िल है मेरी...”

“आज नई मंज़िल है मेरी…”

श्रीनिवास बेलसरे

दिलीपकुमारचा ‘आदमी’(१९६८) हा एका तमिळ चित्रपटाचा (आलयमणी) रिमेक होता. असाच ‘मेरा साया’(१९६६) हा चक्क आपल्या ‘पाठलाग’(१९६४)चा रिमेक होता हे फार थोड्या लोकांना माहीत असेल. ‘पाठलाग’चा तमिळ रिमेकही झाला होता ‘इधय कमलम’ (१९६५) या नावाने! अशा अदलाबदली नेहमी होतच असतात.

‘आदमी’चे दिग्दर्शक होते ए. भीमसिंग आणि निर्माते पी. एस. वीरप्पा! दिलीप कुमारबरोबर वहिदा रहमान, प्राण, मनोजकुमार, सिम्मी गरेवाल होते. या सिनेमातील अख्तर उल इमान यांचे संवाद खूप लोकप्रिय झाले. ‘आदमी’मध्ये नौशाद यांच्या दिग्दर्शनात महम्मद रफींनी गायलेले शकील बदायुनी यांचे एक गाणे अगदी वेगळे होते.

‘अनेक भावनिक चढउतार आणि वैचारिक आवर्तनातून बाहेर पडलेल्या नायकाची मन:स्थिती व्यक्त करणारे, प्रेक्षकांना चिंतनशील मूडमध्ये घेऊन जाणारे गाणे लिहून द्या’ असे एखाद्या दिग्दर्शकाने अचानक सांगितले, तर त्या गीतकाराची काय अवस्था होईल? दिग्दर्शकाला अपेक्षित असलेले नायकाच्या जीवनातले ते भावनिक चढउतार, ते घडवून आणणाऱ्या घटनांचा उल्लेख, त्यातून बाहेर पडताना येऊन गेलेली त्याच्या मनातील वैचारिक आवर्तने कशी काय आणायची बुवा इनमीन ३ कडव्यात? असा प्रश्न आपल्याला पडेल पण शकील बदायुनी नावाच्या सिद्धहस्त शायरला नाही! त्यांनी या सगळ्या गोष्टी लीलया साधणारे सुंदर गाणे लिहून दिले आणि आजही ते रसिकांना आनंद देते, खिळवून ठेवते, चिंतनशील बनवते! शकीलजींचे शब्द होते –

‘आज पुरानी राहोंसे,
कोई मुझे आवाज़ न दे,
दर्दमें डूबे गीत न दे,
गमका सिसकता साज़ न दे.’

आत्महत्या करायला निघालेल्या माणसाला जीवनातले काहीतरी महत्त्वाचे सत्य उलगडते, तो एक निर्धार करून, आनंदाने नवे जीवन जगायला परत फिरतो असा हा प्रसंग!
तारुण्यात सगळ्या भावना तीव्र, उत्स्फूर्त आणि मनाचा ताबा घेण्याइतक्या प्रभावी असतात. त्यामुळे अनेकदा सगळे जीवन निरस बनून मृत्यूला कवटाळावेसे वाटू लागते. तात्कालिक अपयशही मनाला घेरून टाकते. अमुक एक गोष्ट किंवा अमुक व्यक्ती येथून पुढे आपल्या आयुष्यात नाही म्हणजे जगण्याला काही अर्थच नाही, असे वाटणे त्यावेळी स्वाभाविक असते. पण गीतकारांनी मात्र या गाण्यात अशी मन:स्थिती उभी केली आहे, जिच्यात माणूस शांतपणे परिस्थितीवर विजय मिळवून परिपक्वपणे विचार करू लागला आहे.

भूतकाळातील अप्रिय आठवणी मनातून पुसून टाकून त्याने नवे रस्ते, नवे ध्येय निश्चित केले आहे. आता त्याचे मन अगतिक नाही, कुणासाठी झुरणारे नाही. त्याने आपले अस्वस्थ भावविश्व अगदी पुसून टाकून नवे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवले आहे. आता जीवनातील गतवर्षांना, अगदी जुन्या श्रद्धांनाही तो चक्क पाप म्हणून संबोधतो. ‘मी या सगळ्या गुन्ह्यांपासून दूर आलो आहे. मला कुणी भूतकाळातून हाक मारूच नका.’ असे त्याचे सांगणे आहे –

बीते दिनोंकी याद थी जिनमें,
मैं वो तराने भूल चुका…
आज नई मंज़िल है मेरी,
कलके ठिकाने भूल चुका…
न वो दिल न सनम,
न वो दीन-धरम,
अब दूर हूँ सारे गुनाहोंसे.
आज पुरानी राहोंसे…

मला मागे बांधून ठेवणारे प्रेमाचे बंध मीच तोडून टाकले आहेत. मनाचे आकाश स्वच्छ आणि निरभ्र झाले आहे. आता माझ्या मनाच्या आरशात मला कोणतीच अभिलाषा दिसत नाही. मागे बांधून ठेवणारी कोणतीच आसक्ती नसल्याने मी मुक्त आहे, आता कशाला ते दु:खाचे उसासे? मन अगदी निरामय झाले आहे, आनंदी झाले आहे –
टूट चुके सब प्यारके बंधन,
आज कोई ज़ंजीर नहीं.

शीशा-ए-दिलमें अरमानोंकी,
आज कोई तस्वीर नहीं…
अब शाद हूँ मैं, आज़ाद हूँ मैं,
कुछ काम नहीं हैं आहोंसे…
आज पुरानी राहोंसे…

कधी कधी एखाद्या गोष्टीमुळे माणसाचे सगळे जीवनच बदलून जाते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, तर अवघे जगच बदलून जाते. कारण त्याला नव्यानेच उमगलेल्या सत्यामुळे स्वत:तच एक वेगळा माणूस सापडतो. त्याचे स्वत:चेच ते शांत, विमुक्त, रूप पाहून जगण्याचा नवा हुरूप येतो. एखाद्या पक्षाचे पिल्लू पहिल्यांदाच घरट्यातून बाहेर पडावे, त्याने आयुष्यातील पहिली भरारी घ्यावी तसा हा आनंद कल्पनातीत आहे. अशी अनुभूती एक वेगळीच मुक्ती असते. घरट्याशी, बांधून ठेवणारा बंदिवास संपल्याची ती जाणीव जवळजवळ अध्यात्मिकाच बनून जाते –

जीवन बदला, दुनिया बदली,
मन को अनोखा ग्यान मिला.
आज मुझे अपनेही दिलमें,
एक नया इन्सान मिला…

शकील बदायुनी यांनी त्यांच्या जबरदस्त कल्पनाशक्तीमुळे गाणे वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. सिनेमातील कथेच्या मर्यादा ओलांडून ते श्रोत्याच्या मनात खूप व्यापक आशय निर्माण करते. कवी शेवटी म्हणतोय ‘मी आता तिथे पोहोचलो आहे जिथून मला या निर्मितीचे कारण असलेला आणि एरव्ही कधीही न दिसणारा परमेश्वरही अगदी हाकेच्या अंतरावर दिसतो आहे. मला मागे यायचेच नाही. मला परत बोलावू नका –

पहुँचा हूँ वहाँ, नहीं दूर जहाँ,
भगवान भी मेरी निगाहोंसे…
आज पुरानी राहोंसे…

एके काळी चित्रपटातील एक प्रसंग देऊन लिहायला सांगितलेल्या गाण्यातही आमचे कवी केवढा मोठा आशय अगदी जाता जाता उभा करून टाकत असत. हे पाहिले की, त्यांना त्रिवार वंदन करावेसे वाटते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -