डॉ. श्रीराम गीत
अत्यंत हुशार किंवा सामान्य दोन्ही प्रकारच्या मुलांच्या संदर्भात सध्या शिक्षणात येणाऱ्या मोठा अडथळा फक्त दोन गोष्टींचा आहे. मोबाइल आणि कॉम्प्युटर. या दोन गोष्टींमध्येच अडकलेल्या कोणत्याही मुला-मुलींची करिअर ही फक्त बरबादीच्या रस्त्याला आणि उताराला लागलेली आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे हाताश झालेले पालक आता हाताबाहेर चाललेल्या या मुलांचे काय करायचे? या प्रश्नाला भिडताना दिसत आहेत. यंदा दहावी झाल्यावर शिकणाऱ्या मुलापासून ते पदवीपर्यंत या गटातील विद्यार्थ्यांच्या संदर्भात मी आज काही माहिती पालकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे. मराठी पेपर विद्यार्थी वाचत नाहीत म्हणून पालकांसाठी हा उल्लेख.
इंग्रजीतून शिकले व कॉम्प्युटर छान वापरता आला म्हणजे उत्कृष्ट पगार मिळतो, असा एक भ्रम गेल्या दशकात निर्माण झालेला आहे. याला खतपाणी घालण्याचे काम सातत्याने अनेक क्लासवाले, इंग्रजी शाळा चालवणारे संस्थाचालक, इयत्ता आठवी-नववीपासून कोडिंग शिकवतो या नावाखाली चकवा देणाऱ्या अनेक नामवंत कंपन्या सतत करतच आहेत. लवकरात लवकर कॉम्प्युटर छान वापरता आला म्हणजे आपल्याला उत्तम स्वरूपाची नोकरी मिळणारच आहे किंवा अमेरिकेचा रस्ता ‘खुल जा सिम सिम’सारखा आपल्याला उघडणार आहे, या दिवास्वप्नांमध्ये अक्षरशः लाखो पालक अडकलेले आहेत.
वास्तव काय आहे ते समजून घेऊयात
इयत्ता पहिलीपासून कॉम्प्युटरचे शिक्षण इंग्रजी शाळांतून सरसकट दिले जाते. इंग्रजी भाषेचे शिक्षण सर्व शाळेतून इयत्ता पहिलीपासून दिले जाते ते गरजेचेही आहे. अजिबात गरज नाही ती म्हणजे इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची. कॉम्प्युटरच्या संदर्भातसुद्धा हीच गोष्ट तितकीच खरी ठरते. कॉम्प्युटरचा सर्वसाधारण वापर करणे हे प्रत्येकाला अत्यंत गरजेचे झालेले आहे. ज्यांचे वय ५०च्या आत आहे, अशा व्यक्तीला कॉम्प्युटरशिवाय नोकरी मिळणे, काम करणे, दैनंदिन व्यवहार करणे हे शक्य होत नाही. मात्र ही सर्व मंडळी कॉम्प्युटर फक्त वापरत असतात. एका छोट्या उदाहरणातून स्पष्ट करायचे झाले, तर बाईक विकत घेणे, बाईक चालवणे, त्यात पेट्रोल टाकणे, रहदारीचे नियम पाळणे व लायसन्स काढणे याचा अर्थ बंद पडलेली बाईक पुन्हा सुरू करता येते किंवा काही अडले तर दुरुस्त करता येते, असे कधीच नसते. थोडक्यात हा झाला पहिला टप्पा म्हणजेच पहिलीपासून दहावीपर्यंत कॉम्प्युटर शिकणे. पुढचा टप्पा म्हणजे काय बिघडले आहे हे हळूहळू कळायला लागणे. पण ते कळले तरीसुद्धा दुरुस्तीसाठी दुकानात किंवा सेंटरला गाडी न्यावी लागते ना? आणि तिसरा खरा टप्पा म्हणजे गाडीची निर्मिती करणे.
आयटी कंपनीमध्ये ज्या वेळेला सॉफ्टवेअर निर्माण केले जाते, तो हा गाडी तयार करण्याचा तिसरा टप्पा असतो. तसे पाहायला गेले, तर तिसऱ्या टप्प्यावरचे काम करणाऱ्या भारतीय कंपन्या जेमतेम हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच आहेत. दुसऱ्या टप्प्यावरचे काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये अनेक अमेरिकन, भारतीय किंवा विविध परदेशस्थ भारतीयांनी स्थापलेल्या कंपन्यांची गणना होत आहे. आपल्या मुला-मुलींची प्रगती पहिल्या टप्प्यापासून तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त आणि फक्त एकाच गोष्टीची गरज असते ती म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स या विषयांबद्दल मी बोलत आहे. या उलट इयत्ता आठवी-नववीपासूनच पालक-मुले कॉम्प्युटर, कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटर याच विषयाची चर्चा करण्यात वेळ घालवत आहेत. दहावीनंतरची सर्वच मुले मोबाइलवर, इंटरनेटवर, कॉम्प्युटर संदर्भातील अभ्यासाचे मी रिसर्च करतो या नावाखाली विनाकारण वेळ घालवत आहेत. खूप आधीपासून कॉम्प्युटर शिकला म्हणजे जास्त प्रगती होते या भ्रमातून अक्षरश: लाखो पालकांनी बाहेर येणे अत्यंत गरजेचे आहे. अतिशय तल्लख बुद्धी उत्तम गणिताची समज आणि त्याच्या जोडीला लॉजिक म्हणजेच तर्क, विचार, बुद्धी या तिन्हींचा संगम असलेला हजारात एखादाच मुलगा वयाच्या पाचवी-सहावीपासून यात गती मिळवू शकतो. अन्यथा, साऱ्यांसाठीचा नेहमीचा रस्ता याआधीच लिहिले आहे, तसा बारावीच्या पीसीएमच्या मार्कांतून व कॉम्प्युटर सायन्समधील पदवीतूनच जातो.
शेवटचा एक नेमका उल्लेख करून हा विषय आज थांबवता येईल. कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटी हा विषय घेऊन इंजिनीअरिंग करणाऱ्या कोणत्याही कॉलेजच्या, कोणत्याही उत्तम संस्थेतल्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर नावाचा विषयसुद्धा नसतो. इंजिनीरिंगच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाचे विषय सारखेच असतात. तशीच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कितीही हुशार मुलगा जेव्हा कॅम्पसद्वारा नोकरी मिळवून आयटी कंपनीत कामाला सुरुवात करतो तेव्हा त्याला भरपगारी एक वर्षाचे ट्रेनिंग द्यावेच लागते. कॉलेजात शिकलेले प्रोग्रामिंगचे शिक्षण तिथे कधीच उपयोगी पडत नसते. वाचा, विचार करा व मुलांवर योग्य तो अभ्यास करण्यासाठीचा आग्रह धरा.