Friday, March 21, 2025
Homeसाप्ताहिककोलाजदशावतारातील पहिली पखवाज वादक

दशावतारातील पहिली पखवाज वादक

प्रियानी पाटील

कोकण आणि दशावतार असं कलेचं एक अतूट नातं आहे. ही कला परंपरागत असून यामध्ये पुरातन कथा, लढाई, राजा, प्रजा यांबरोबरच नाट्यमय घडामोडींचे दर्शन या कलेतून दिसून येते. कोकणातील ही कला साऱ्यांच्याच पसंतीची. त्यात राजा, प्रजा, देव दानव यांच्या लढाईचा प्रसंग आला, तर अजून उत्सुकता. पण या दशावतारामध्ये प्रसंग लढाईचा असो किंवा एखाद्या आनंदाचा, हर्षाचा असो किंवा दु:खाचा. एखादा प्रसंग उभा करण्यासाठी दशावतारामध्ये संगीत, पखवाजाचा नाद, लय, ताल अत्यंत आवश्यक ठरून जातो.

पखवाजाचा नाद एखाद्या संवादाला साथ देऊन जातो. पखवाज वादन ही देखील एक कला आहे. केवळ तबल्यावर हात ठेवला आणि वाजवले म्हणजे पखवाज वादन यशस्वी झाले असे होत नाही. तर त्यासाठीही अंतरात शिकण्याची आवड असावी लागते. शिक्षण घ्यावे लागते आणि यासाठी गुरू देखील करावा लागतो.

दशावतारात बहुतांशी कलाकार हे पुरुषच दिसून येतात. देव, दानव, राजा, प्रधान अशी अनेक कॅरेक्टर साकारली जातात. मात्र राणी, दासी, अशीदेखील स्त्रीपात्र असतात, ती पुरुषच साकारतात. एकंदरीत सारा दशावताराचा कार्यक्रम पुरुष कलाकारांनीच साकारलेला असतो. मग संगीत देण्याचा भाग आला तिथेही आजवर पुरुषच साथ देत आले आहेत. मात्र या चालीरीतीला कलाटणी देत दशावतारामध्ये एक स्त्री पखवाज वादक म्हणून नवा पायंडा घातला आहे, तो वेंगुर्ले खानोली येथील भाविका लक्ष्मण खानोलकर हिने. तिने या वर्षीच पखवाज वादनाला सुरुवात केली आहे आणि कोकणात दशावतारामध्ये पखवाज वादन करणारी भाविका ही पहिली महिला पखवाज वादक ठरली आहे.

भाविका आता बारावीला आहे. मात्र शिक्षण घेता घेता पखवाज वादनाची कला जोपासण्याचा तिने बांधलेला चंग तिच्या यशाला चांगलीच कलाटणी देणारा ठरला आहे. आजवर तिने २५ दशावताराच्या प्रयोगामध्ये पखवाज वादन केले आहे. पखवाज वादन शिकण्यासाठी तिला घरातून आजोबांचा वारसा मिळाला, तर तिचे गुरुवर्य नीलेश पेडणेकर, वेंगुर्ला यांनी तिला पखवाज वादन शिकवले. कधी कधी एखादा कोर्स केला आणि सोडून दिला असं होतं. संधी मिळाली नाही म्हणून ती कला अर्धवट राहून जाते. पण भाविकाने आपली कला जोपासली आहे.

सुरुवातीला भजनांमध्ये पखवाज वादन करत आत्मविश्वास मिळवणारी भाविका नंतर दशावतारामध्ये पखवाज वादनासाठी सज्ज झाली आणि महिलांमध्ये ती पहिली पखवाज वादक ठरली आहे. दशावतार पखवाज वादनाचे भाविकाचे हे पहिलेच वर्ष आहे. दशावतारामध्ये ठुमरी, लढाई विरश्रीच्या प्रसंगाला पखवाज वादनाचा फार उपयोग होतो. कारण संपूर्ण लढाई ही पखवाजाच्या ठेक्यावर चालते. पखवाजाचा नाद दशावतारात नादमय वातावरण निर्माण करतो. तर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी आिण दशावतारातील लढाईला रंगत आणण्यासाठी पखवाजाचा नाद अत्यंत कुशाग्र कलाकारी निर्माण करतो. यावेळी पखवाज वादकाचे श्रेय पणाला लागतेच शिवाय कौशल्यही दिसून येते. भाविकाचा नाद आणि ठेका आज कोकणातील दशावतार गाजतो अाहे. एका स्त्रीच्या कलेला दशावतात मिळालेली संधी ही परंपरेच्या वारशामध्ये प्रथमच कोरण्यासारखी आहे. कारण तबला-पखवाज, हार्मोनियवर विशेषत: पुरुषच साथ देताना आपण पाहिले आहे. पण भाविकाला मिळालेली संधी तिच्या कलेची आवड जोपासणारी ठरणार आहे.

भाविकाने या वर्षीच या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. यातून तिने सिंधुदुर्गमध्ये मालवण, धानोली, दाभोली, दोडामार्ग आदी ठिकाणी झालेल्या दशावताराच्या प्रयोगामध्ये पखवाज वादन केले आहे.

दशावतारात पखवाज वादन एक आवड म्हणून भाविका जोपासत असल्याचे सांगते. दशावताराचे प्रयोग हे सीझनवाईज असतात. घरातून मिळालेला वारसा जोपासताना भाविका बिनधास्तपणे दशावतारात न डगमगता पखवाज वादन करते. तिच्या कलेला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे. दशावतारात वादन करताना वादन हे ठेक्यातच येणे जरुरीचे असते. नाद महत्त्वाचा असतो. ठेका चुकला तर नाट्य बिघडण्याचीही शक्यता असते. त्यासाठी लढाई म्हटली तर ती पखवाजाच्या तीन ठेक्यातच येणे गरजेचे असते. प्रत्येक कलेला जसे कौशल्य असते तसे नियमही असतात. आणि त्या नियमात भाविका पूर्णपणे समरसून गेली आहे. पखवाज वादनाचा नाद, ठेका, लय जाणताना भाविकाने शिक्षणही सुरू ठेवले आहे. तिच्या कलेला घरातून पाठिंबा मिळत आहे. पुढे पखवाज वादनात करिअरची संधी आहे की नाही माहीत नाही, पण ही कला आयुष्यभर जोपासणार असल्याचे भाविका मनोमन सांगते.

दशावताराचा कार्यक्रम पुरुष कलाकारांनीच साकारलेला असतो. मात्र याला कलाटणी देत दशावतारामध्ये नवा पायंडा घातला आहे तो भाविका खानोलकर हिने. कोकणातदशावतारामध्ये पखवाज वादन करणारी भाविका ही पहिली महिला पखवाज वादक ठरली आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -