मुंबई (प्रतिनिधी) : जर्मन येथील स्टुटगार्डच्या धर्तीवर वांद्रे कलानगर येथे मुंबईच्या सिस्टर सिटीजच्या मैत्रीचे प्रतीक उभारण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असून १५ भगिनी शहरांचे ध्वज तेथे फडकणार आहेत. यामुळे मुंबईच्या आकर्षणातही भर पडणार असून एक नवीन पर्यटन तयार होणार आहे.
दरम्यान मुंबई शहराचा जगातील विविध देशांमधील १५ शहरांबरोबर भगिनी शहर म्हणून मैत्रीचा करार झाला आहे. त्यामध्ये बर्लिन (जर्मनी), लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क (अमेरिका), सेंट पीटर्सबर्ग (रशिया), स्टुटगार्ड (जर्मनी), योकोहामा (जपान), होनोलुलु (हवाई), झाग्रेब (क्रोएशिया), बार्सिलोना (स्पेन), बुसान (दक्षिण कोरिया), पोर्ट ऑफ ओडेसा (युक्रेन), जकार्ता (इंडोनेशिया), नाडी (फिजी), अँटानानारिवो (मादागास्कर) आणि शांघाय (चीन) या शहरांचा समावेश आहे, तर नात्याचा सन्मान करण्यासाठी पालिकेने कलानगर जंक्शनवर सिस्टर सिटी स्क्वेअर उभारण्याची योजना आखली असून या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
दरम्यान यासाठी पालिकेने ई-निविदा मागवल्या असून प्रकल्पासाठी अंदाजे एक कोटी ६३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प सहा महिन्यांमध्ये साकारण्यात येणार आहे.