सुनील सकपाळ
मनोरंजन क्षेत्रात वेगळी ओळख असलेला, अनेक मराठी आणि हिंदी सिनेमात तसेच टीव्ही मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारा अष्टपैलू विनोदी अभिनेता संजय नार्वेकर आता रंगभूमीवर चमत्कार करायला येत आहे. तसे पाहिले तर मनोरंजन क्षेत्रात चमत्कार नेहमी घडतच असतात. पण इथे जादुई चमत्कार घडणार असून तो प्रत्यक्षात रसिकांना पाहायला मिळणार आहे. कारण संजय नार्वेकर प्रथमच बालनाट्यात काम करतोय. ‘चमत्कार’ असे त्याचे नाव आहे. साईराज निर्मित, ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी लिखित आणि ऋषिकेश घोसाळकर दिग्दर्शित ‘चमत्कार’ या बालनाट्याच्या सुरुवातीच्या प्रयोगांना बच्चे कंपनीचा चांगला प्रतिसाद लाभला.
बालनाट्य म्हटले की, गमती जमती, चमत्कार, गिमिक्स हे आलेच. ‘चमत्कार’ हे नाटक अभ्यास या विषयावर अवलंबून आहे. घरात पैसा म्हणजे सगळं काही, अशी समज असणारे आई-बाबा आपल्या मुलांना अभ्यासापासून नेहमी परावृत्त करत असतात. या त्रासाला कंटाळलेली मुलं आपल्या आई- बाबांचा कसा विरोध करतात. त्यांना त्रास देण्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या युक्त्या वापरत असतात. त्यातूने ज्या काही गमती जमती, चमत्कार घडतात, ते या नाटकात पाहायला मिळणार आहेत. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांचे लेखन, लोकप्रिय विनोदी अभिनेता संजय नार्वेकर यांचा अभिनय, ऋषिकेश घोसाळकर यांचे दिग्दर्शन आणि दर्जेदार बालनाट्यासाठी प्रसिद्ध असलेली साईराज नाट्यसंस्था असा दुग्धशर्करा योग या नाटकाद्वारे जुळून आला आहे. लेखक – दिग्दर्शक व निर्माते ऋषिकेश घोसाळकर यांनी आतापर्यंत अनेक लोकप्रिय बालनाट्ये व व्यावसायिक नाटकं सादर केली आहेत. त्यांचे “हरी आला दारी” हे व्यावसायिक नाटक खूपच लोकप्रिय झाले होते. ‘चमत्कार’ हे त्यांचे १२ वे व्यावसायिक नाटक आहे.
या नाटकातून त्यांनी आजच्या मुलांचं भावविश्व साकारलं असून मनोरंजनाबरोबरच एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न या नाटकातून केला आहे. आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता संजय नार्वेकर यात प्रमुख भूमिकेत असून सोबत हिमांगी सुर्वे, प्रियांका कासले, चिंतन लांबे, संदेश अहिरे, प्रणाली बोराले, नेहा चव्हाण, अर्चित टक्के, सुधांशु कुलकर्णी, नीलिशा लाड, स्वरा वाडकर, मानस वसाने, उर्वी पटेल, मनवा वसाने, तीर्थ पटेल हे कलाकार दिसणार आहेत. या नाटकाचे सूत्रधार गोट्याकाका सावंत असून व्यवस्थापक शेखर दाते आहेत. चमत्काराबरोबरच फूल टू मनोरंजन करणारे हे बालनाट्य लहान मुलांसह मोठ्यांसाठी देखील आकर्षण ठरणार आहे.