
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने आपल्या दवाखान्यांमध्ये पॉलीक्लिनिक व डायग्नोस्टिक आरोग्य सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून सध्या १० दवाखान्यांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने स्वारस्य अभिव्यक्ती म्हणजेच इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
दरम्यान महापालिका आयुक्तांनी महापालिका अर्थसंकल्प २०२२-२३ सादर करताना मुंबईत १०० ठिकाणी पॉलिक्लिनिक सुरू करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता या सुविधेला सुरुवात झाली असून प्रमुख रुग्णालयांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या कान, नाक, घसा तपासणी, नेत्र तपासणी, अस्थिरोग, त्वचारोग, बालरोग, स्त्रीरोग तपासणी, दंतरोग तपासणी व जनरल फिजिशियन इत्यादी सेवा देण्यात येणार आहेत, तर आपल्या घराशेजारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र या योजनेअंतर्गत उपलब्ध दवाखान्यांमध्ये १०० ठिकाणी अशा प्रकारचे पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी सुरुवातीस १० दवाखान्यांची निवड करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या केंद्राच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांनकडूनच नेत्ररोग, कान-नाक-घसा, दंत चिकित्सा केली जाणार आहे. यासाठी आवश्यक कन्सल्टेशन सुविधा देण्याकरिता प्रथमतः नेत्ररोग तज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ, दंत चिकित्सक यांची आवश्यकता आहे. यासाठी आरोग्य विभाग तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक देखील करणार आहेत.
दंतचिकित्सा सुविधेसाठी बीडीएस पदवीधारक आणि नेत्र रोग व कान-नाक-घसा सुविधेसाठी एम.एस.डी. ओ.एम.एस आणि एमएस / डी.एल.ओ पदव्युत्तर पदवीधारक कमीत कमी तीन वर्षे कामाचा अनुभव असणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून अर्ज मागविले आहेत.
या रुग्णालयांत मिळतील आरोग्य सुविधा
परिमंडळ / वॉर्ड / डिस्पेन्सरी. - ३/एच पश्चिम - गुरुनानक डिस्पेन्सरी, के पूर्व - व्ही एन शिरोडकर डिस्पेन्सरी. - ४ के. पश्चिम - एन. जे. वाडिया डिस्पेन्सरी. बनाना लीफ डिस्पेन्सरी. - ६ एन - साईनाथ डिस्पे. एस - टागोर नगर डिस्पेन्सरी. टी - डीडीयु मार्ग डिस्पेन्सरी. पी उत्तर राठोडी डीस्पेन्सरी. - ७, आर. दक्षिण - शैलजा गिरकर डिस्पेन्सरी. आर. सेंट्रल - काजूपाडा डिस्पेन्सरी. आर. उत्तर - वाय. आर. तावडे डिस्पेन्सरी.