रमेश तांबे
एका जंगलात एक हरिण राहायची. ती आई होती दोन पिल्लांची. एकीचं नाव होतं पियू अन् दुसरीचं नाव होतं मियू! पियू अन् मियू खूप मजा करायच्या, इकडे तिकडे धावत सुटायच्या. आनंदाने उड्या मारायच्या, लुसलुशीत गवतात लोळायच्या. हिरवे हिरवे गवत खायच्या. आईचे दूध लुचूलुचू प्यायच्या. हरिण आपल्या पिल्लांकडे कौतुकाने बघत बसायची. बघता बघता मधेच रडायची. मियू, पियूच्या हे लक्षात यायचे. “आई आई का रडते?” असे विचारायच्या. आई हसून म्हणायची काही नाही. पियू परत उड्या मारत जायची. पण मियू मात्र आईलाच बिलगायची. आईच्या कुशीत शिरून मियू विचारायची, “आई सांग ना गं, आई सांग ना गं” असं म्हणायची. मियूच्या हट्टामुळे आईला एकदम रडू आले. डोळे पुसत आईने पियूला हाक मारली. पियू धावत येऊन आई पुढे बसली अन् म्हणाली, “आई लवकर सांग ना मला खेळायला जायचंय!”
आई म्हणाली, “बाळांनो, आता तुम्ही मोठे झालात. तुम्ही धावत सुटता, इकडे तिकडे उड्या मारता. त्याची तुम्हाला मजा वाटते. पण लक्षात ठेवा मी काय सांगते. वेगळेच आहेत या जंगलचे कायदे. इथं आहेत वाघ, सिंह, कोल्हे आणि लांडगे. सारेच टपलेले असतात. केव्हाही, कधीही झडप घालतात. एका क्षणात आपला जीव घेतात. मिटक्या मारीत आपले मांस खातात. माझ्यासमोर तुझ्या बाबांना, तुमच्या मोठ्या भावांना या प्राण्यांनीच संपवले, मीच त्यातून कशीबशी वाचले, तेव्हा तुम्ही दोघी माझ्या पोटात होत्या.”
आईचं बोलणं पियू, मियू ऐकत होत्या. पियूच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव होते. आई म्हणाली, “पण घाबरायचं नाही. नेहमी कळपात राहायचं. खाता खेळता सगळीकडे लक्ष ठेवायचं. आपल्या सगळ्या हरणांना खूप जोरात पळता येतं. अगदी वाघ, सिंहापेक्षाही खूप जोरात. पण नेहमी सावध राहायचं. रोज धावण्याचा सराव हवाच. जरा कुणा प्राण्याची चाहूल लागली की धूमचकाट पळून जायचं. आपले कान नेहमी उघडे ठेवायचे. एवढं जमलं की जंगल म्हणजे मजाच मजा!”
मियू म्हणाली, “आई लक्षात ठेवीन, तू सांगितल्याप्रमाणेच वागेन. कळप सोडून कधी जाणार नाही. कायम सावधपणे लक्ष ठेवीन शिवाय पियूची काळजीदेखील घेईन.” आईला मियूचे कौतुक वाटले. तेवढ्यात आईने वाघाचे आवाज ऐकले. आईने इशारा करताच पियू, मियू झाडीत लपले. दूरवरून येणाऱ्या वाघाला पियू, मियूने प्रथमच बघितले. वाघाला बघताच पियू आईच्या कुशीत शिरली. मियू मात्र वाघाला गूपचूप एकटक बघतच बसली. वाघ निघून जाताच आई म्हणाली, “बाळांनो, वाघाच्या समोर जायचं नाही. नजरेला त्याच्या पडायचं नाही.” आई शिकवत होती. पियू, मियू शिकत होत्या. एक एक दिवस सरत होता. पियू, मियू मोठ्या झाल्या. आईचं वयदेखील उतरणीला लागलं होतं!
एके दिवशी छान प्रसन्न सकाळी पियू, मियू खेळत होत्या रानात, आई बसली होती झुडपात. तेवढ्यात समोरून आला पट्टेरी वाघ, गुरगुरत धावत होता वेगात. मियूने पियूला इशारा करताच दोघीही पळत सुटल्या. त्या दोघीत मियू होती धाडसी अन् तरबेज. पण पियू थोडी आळशी अन् कमजोर. पियू वाघाच्या तावडीत सापडणार असे दिसताच आई धावली जीवाच्या आकांताने अन् गेली वाघाला सामोरी. वाघाला मिळाली आयती शिकार, पियू मियू झाल्या जंगलात पसार. मियू, पियू धाव धाव धावल्या, मग एका ठिकाणी थांबल्या. काही वेळानंतर
मियूने आजूबाजूला पाहिले, धोका नाही आता तिने ओळखले. त्यांना आईची आली आठवण, मग त्या दोघी माघारी फिरल्या!
नंतर दोघी आल्या नेहमीच्या झुडपाजवळ, पण आई तिथे दिसेना. ओरडून सांगितले आईला, आई आम्ही आलो. पण कुठे आवाज नाही की कसली हालचाल नाही. तेव्हा मियूच्या लक्षात आले आपल्याला वाचवण्यासाठी आईने घातला धोक्यात जीव. मियूला वाटली स्वतःची कीव! मियूने पियूला जवळ घेतले. तेव्हा तिच्या डोळ्यांतून टपटप पाणी पडू लागले. मियूने पियूच्या अंगाला अंग घासले. आता मियू पियूची आई झाली. मियू आता खूपच मोठी झाली होती. मित्रांनो एकच महत्त्वाचं सांगतो…
शेवटी आई ही आई असते… ती तिच्या लेकरांसाठी देवाचं रूप असते!