
अनुराधा परब
संशोधनादरम्यान एखाद्या मुद्द्याचा विचार आपण काय आणि कोणत्या परिप्रेक्ष्यात करतो, कोणत्या संदर्भात अथवा पार्श्वभूमीवर करतो यावर अनेक बाबी अवलंबून असतात. प्राचीन काळापासून भृगुकच्छ (भडोच) ते पार केरळपर्यंतच्या विस्तृत भूभागाचा उल्लेख हा ‘कोकण’ असा केला जातो. त्यातही महाराष्ट्रातील डहाणूपासून ते बांद्यापर्यंतच्या पट्ट्याची ओळख ही आपले ‘परिचित कोकण’ अशी आहे. प्रस्तूत सदरामध्ये आपण प्रामुख्याने त्या परिचित कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि तेथील संस्कृतीविषयी बोलत असलो तरीदेखील विस्तृत कोकणाचा साकल्याने विचार करणे हे क्रमप्राप्त ठरते.
भारताची पश्चिम किनारपट्टी हा कोकणाच्या संस्कृतीचा कणा आहे. किंबहुना म्हणूनच संपूर्ण भारत एका विशिष्ट पद्धतीने वागत असताना कोकणची किनारपट्टी मात्र ऐतिहासिक कालखंडात अनेकदा वेगळी वागताना दिसते. कोकणाला किनारपट्टीच्या अर्थशास्त्राने बांधलेले आहे. व्यक्ती, राज्य किंवा देश असो अर्थशास्त्र हेच त्याच्या संस्कृतीचा पाया असते. हे मूलतत्त्व लक्षात घेतल्यास सागरी जीवनाशी जोडलेले कोकणाचे अर्थशास्त्र हे त्याच्या संस्कृतीनिश्चितीमध्ये महत्त्वाचे योगदान देताना दिसते. अगदी पार इजिप्तमध्ये मेम्फिस या ठिकाणी झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननामध्येदेखील कोकणाचे ग्रीक आणि इजिप्त या देशांशी असलेले प्राचीन व्यापारी संबंधांचे धागेदोरे सापडतात. इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून कोकणाचा उल्लेख सापडतो. सम्राट अशोकाने धम्मरक्खित या बौद्ध भिक्खूला धर्मप्रसारार्थ अपरान्त म्हणजे कोकणात धाडले. इसवी सन पूर्व शतकापासून महाराष्ट्रात सापडणाऱ्या बौद्धलेणी हे त्याचेच पुरावे आहेत. या बौद्धलेणी पार गोव्यापर्यंत महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सापडतात. महाराष्ट्रात सोपारा, कान्हेरी, एलिफंटाचा बौद्ध स्तूप, चौल आणि कुड्याची लेणी, महाडची गांधारपालेची लेणी, पन्हाळेकाजी अशी अखंड मालिकाच आपल्याला कोकणातील बंदरांनजीक उभी राहिलेली दिसते. सिंधुदुर्गदेखील त्याला अपवाद नाही. सिंधुदुर्गामध्ये लेणी मोठ्या प्रमाणावर नसली तरी प्राचीन बंदरे आणि त्यांचे अवशेष हे मोठ्या प्रमाणावर सापडतात. त्यातील काही बंदरे ही किनाऱ्यालगत, तर काही खाड्यांच्या आतील बाजूस होती.
कुणा एका ग्रीक व्यापाऱ्याने मार्गदर्शनपर लिहिलेल्या ‘पेरिप्लस ऑफ एरिथ्रिअन सी’ या पुस्तकामध्ये कोकणातील बंदरांचे उल्लेख सापडतात. एरिथ्रिअन सी म्हणजे प्रस्तुत काळातील अरबी समुद्र. इसवी सन अठराशेच्या सुमारास पेरिप्लसच्या अभ्यासाला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. पेरिप्लसमधील उल्लेख करण्यात आलेली कोकणातील बंदरे नेमकी कोणती याचा शोध आजही अनेक संशोधक घेत आहेत. त्यात मँडागोरा, मेलिझेइगारा, बायझँटिअम, तुरान्नोसबोअस, तोपारोन, चेमुल आदी उल्लेख सापडतात. अनेक तज्ज्ञांनी जयगड, देवगड, आचरा, तेरेखोल, बाणकोट, मालवण, चौल, सोपारा आदी बंदरांशी पेरिप्लसमधील बंदरांची नावे वर्णनावरून जोडण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त पेरिप्लसच नव्हे, तर पहिल्या शतकात प्लिनीने लिहिलेल्या ‘पॅसेज टू इंडिया’ या नोंदीमध्ये सिगेरस, नित्रिएस आदी उल्लेख सापडतात. संशोधकांना वाटते, की सिगेरस म्हणजे मालवण, तर नित्रिएस म्हणजे निवती बंदर होय. टोलोमी या ग्रीक भूगोलतज्ज्ञानेही भारताच्या पश्चिम किनारपट्टीला भेट देऊन चार भागांत त्याची विभागणी केली. या चार भागांपैकी अराइके असा उल्लेख असलेला भाग हा विद्यमान महाराष्ट्रातील किनारपट्टीचा असावा, असे संशोधकांना वाटते. संशोधकांच्या मते, ज्या बंदरांचे उल्लेख प्राचीन नोंदींमध्ये वारंवार येतात त्यात जयगड, देवगड, आचरा, मालवण, वेंगुर्ला यांचे उल्लेख आधिक्याने सापडतात. मध्ययुगामध्ये अरबांशी मोठ्या प्रमाणावर व्यापार सुरू झाला तो छत्रपतींच्या कालखंडापर्यंत आणि नंतरही अव्याहत सुरू होता. त्याचे पुरावेही आजवर अनेकदा अनेक ठिकाणी सापडले आहेत.
पोसायडन हा ग्रीकमधील समुद्रदेव मानला जातो. प्राचीन काळी ग्रीक व्यापारी सागरी मार्गाने येत असताना सोबत पोसायडनची मूर्ती बाळगीत असत. समुद्रदेवता सोबत असल्याने आपल्यावर निसर्गाचा प्रकोप होणार नाही, ही त्यामागील त्यांची श्रद्धा होती. अशाच एका व्यापाऱ्यासोबत आलेली पोसायडनची छोटी मूर्ती कोल्हापूरच्या ब्रह्मपुरी येथे झालेल्या उत्खननामध्ये संशोधकांना सापडली. कोल्हापूरमध्ये आलेली ही मूर्ती आचरा ते तेरेखोलपर्यंतच्या कोणत्या तरी एका बंदरावरून व्यापारी मार्गाने व्यापारी मालासह कोल्हापुरात पोहोचली, असे संशोधकांना ठामपणे वाटते. कोल्हापूर हे दीर्घकाळ व्यापाराचे एक महत्त्वाचे ठाणे राहिले होते आणि ते सिंधुदुर्गातील बंदरांशी घाटमार्गाने जोडलेले होते.
अठराव्या शतकाच्या आसपास ‘सह्याद्रीखण्ड’ नावाच्या ग्रंथाची रचना करण्यात आली. कोकणाच्या संदर्भात सह्याद्रीखण्डात आलेले उल्लेख हे त्याहीपूर्वी स्कंदपुराण, पद्मपुराण इत्यादींमध्ये आलेले दिसतात. त्यातील काही पुराणांची रचना ही थेट इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकापर्यंत मागे जाते. या पुराणांमध्ये किंवा सह्याद्रीखण्डात आपल्याला विविध स्थळांची नावेही सापडतात. सह्याद्रीखण्डात सिंधुदुर्गातील अनेक ठिकाणांची नावे आहेत. त्यात कुडाळचा स्पष्ट उल्लेखच सापडतो. पुराणांतून किंवा सह्याद्रीखण्डातून येणारी ही नावे एका वेगळ्या अर्थाने सिंधुदुर्गाचे प्राचीनत्व सिद्ध करताना दिसतात. अशा या सह्याद्रीखण्डाचाही पुरेशा साकल्याने अभ्यास आजवर झालेला नाही. सध्या मुंबईच्या एशियाटिक सोसायटीतर्फे या संदर्भात संशोधन सुरू असल्याचे समजते. हा अभ्यास पूर्णत्वास जाईल त्यावेळेस सिंधुदुर्गातील अनेक ठिकाणांचे स्थानमहात्म्य उलगडले जाणे अपेक्षित आहे.
(ज्येष्ठ पत्रकार, प्राचीन संस्कृती अभ्यासक)