कासा (वार्ताहर) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सोमटा गावाच्या हद्दीमध्ये भरधाव ट्रकने समोर बंद पडलेल्या ट्रकला जोरात धडक दिली. या अपघातामध्ये बंद पडलेल्या ट्रकजवळ सेवा बजावत असलेल्या महामार्ग पोलिसांचे दोन आणि आयआरबी कंपनीचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
पहाटे ३ च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणारा एक ट्रक बंद पडला होता. ट्रकजवळ मागील वाहनांना सावध करून मार्गिका बदलण्यास सांगण्यासाठी महामार्ग पोलिसांचे सचिन धानिवरे (पो.ह.), मधुकर गोदाले (पो.ह.) व आयआरबी कंपनीचे अमित क्रिश्न व शौकत शेख हे कर्मचारी काम करत होते. रात्रीच्या वेळी अचानक दुसरा ट्रक गुजरातच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता.
समोर ट्रक उभा असल्याने अपघात होऊ नये म्हणून पोलीस व आयआरबीचे कर्मचारी सदर ट्रकचालकाला सावध करून थांबण्यास सांगत होते; परंतु ट्रकचालकाला झोप लागली असल्याने त्याने त्याच वेगाने चारही कर्मचाऱ्यांना आणि उभ्या असलेल्या ट्रकला जोरात धडक दिली. या अपघातात सचिन धानिवरे व मधुकर गोदाले गंभीर जखमी झाले.