पर्यटन व्यवसायालाही चटके
मुरूड (वार्ताहर) : राज्यात तापमानाचा पारा चढत असताना हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसाच्या सरी बरसल्या आहेत. तथापि, या अवकाळी पावसामुळे तापमानात अचानक वाढ झाली व मुरूडचा पारा ३७.०५ अंशावर गेला आहे. याचाच परिणाम होऊन मुरुडला येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे मुरुड समुद्रकिनारी तुरळक पर्यटक दिसत होते. याचा परिणाम पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यवसायाला ही चटके सहन करावे लागले.
गेल्याच महिन्यात मार्च १२, १३, १४ रोजी उष्णतेची लाट आली होती. त्यावेळी मुरुडचा पारा ४० अंशांवर गेला होता. आताही हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अवकाळी पाऊस पडल्यामुळे व ढगाळ वातावरणामुळे वातावरणात प्रचंड उष्णता निर्माण झाली. त्यामुळे मुरूडचा पारा वाढण्यास सुरुवात झाली व तापमान ३७.०५ अंशांवर गेल्याने पुन्हा एकदा मुरुड तापुलागले आहे. आता राज्यात सर्वत्र उष्णता वाढल्याने फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे.
मुरूड पर्यटनस्थळ असल्याने येथील बहुतांश व्यवसाय पर्यटनावर अवलंबून आहेत. गेली दोन वर्षे कोरोनाचा कहर होता. त्यामुळे सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद होते. आता कुठे कोरोनाचा कहर संपुष्टात आल्यानंतर हळूहळू पर्यटक मुरुडला येऊ लागले आहेत. त्यामुळे पर्टकांवर अवलंबून असलेल्या व्यवसायाला पुन्हा एकदा उभारी येऊ लागली असतानाच, अचानक वातावरणात होणारे बदल व त्यामुळे अवकाळी पडणारा पाऊस, वादळी वारे, यांचा परिणाम वातावरणातील तापमानावर होऊन उष्णतेत वाढ होते.
समुद्रकिनारी तुरळक पर्यटक
या असह्य होणाऱ्या उष्णतेमुळे पर्यटक बाहेर पडणे बंद झाले आहेत. त्यामुळे मुरुडला पर्यटकांची तुरळक गर्दी पाहावयास मिळत आहे. मुरूड समुद्रकिनारी घोडागाडी, बग्गी चालक, घोडेस्वार, खाद्यपदार्थांचे स्टॉल, आईस्क्रीम, थंड पेय, खाणावळ, लॉजिंग व्यवसायालाही या उन्हाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाली आहेत.