Friday, May 9, 2025

रायगड

भाववाढीमुळे लिंबू सरबत झाले दुर्मीळ

भाववाढीमुळे लिंबू सरबत झाले दुर्मीळ

उरण (वार्ताहर) : कडक उन्हाळ्यात शरीरास लिंबू आरोग्यवर्धक असल्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांना दुपारच्या वेळी दिले जाणारे लिंबू सरबत लिंबाच्या भावामुळे सर्वसामान्यांना दुर्मीळ झाले असून पाहुण्यांना काय पाहुणचार करावा, असा प्रश्न ग्रामीण भागात पडला आहे.


एरवी २ - ३ रुपयांना मिळणारे लिंबू दहा रुपयांना झाल्यामुळे सर्वसामान्यांना घेण्यास परवडत नाही. १५० ते २०० रुपये किलोपर्यंत भाव गेल्यामुळे लिंबू सरबत पिणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. शरीरातील उष्णता कमी करून ऊर्जा मिळण्यासाठी लिंबू सरबतचा वापर सर्रास केला जातो. हॉटेल आणि रसवंतीगृहातही त्याचा सर्रास वापर होतो. मात्र लिंबाचे दर गगनाला भिडल्यामुळे हॉटेल आणि रसवंतीगृहातूनही लिंबू गायब झाले आहे.


लिंबाचे भाव वाढल्यामुळे शेतकरी जरी आनंदित असला लहरी हवामानामुळे लिंबाच्या झाडाला फळे कमी आली आहे. त्यामुळे बाजारात आवकही कमी आहे. त्यामुळे लिंबाचे दर कडाडले आहेत. सर्वसामान्यांच्या जेवणाच्या ताटात दिले जाणारे लिंबू आता ग्रामीण भागातही गायब झाले आहे.


मध्यंतरी वातावरण खराब झाल्यामुळे लिंबाच्या झाडाला लिंबू कमी प्रमाणात लागली. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला. एरव्ही शेतकऱ्यांना दहा रुपयांना दहा लिंबू विकण्याची वेळ येते. मात्र आता सफरचंदाच्या भावात लिंबू भाव खात असल्यामुळे उन्हाळ्यात ऊसाचा रस, अननस, चिक्कू, आंबा यापासून तयार होणारे ज्यूस घेण्यावर लोकांचा भर दिसत आहे. दरम्यान, लिंबाबरोबरच मिरचीचे भावही गगनाला भिडले असून लिंबू-मिरचीचा व्यवसाय करणाऱ्यांनीही त्यांचे भाव दुपटी-तिपटीने वाढवले आहेत. एकूणच लिंबामुळे उन्हाळ्यात मिळणारा गारवा मात्र सर्वसामान्यांना दुरापास्त झाला आहे.


इतर फळांच्या ज्यूसला ग्राहकांची पसंती


भाववाढीमुळे लिंबाचे सरबत सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहचवत आहे. त्यामुळे चिक्कू, आंबा यापासून तयार होणाऱ्या ज्यूसला मोठी मागणी आहे. एक ग्लास सरबतासाठी एक लिंबू लागत असल्यामुळे प्रति ग्लास वीस रुपये देण्यास ग्राहक टाळाटाळ करतात. त्यामुळे लिंबू सरबताऐवजी कमी किमतीत तयार होणारे इतर फळांच्या ज्यूसला ग्राहकांची पसंती आहे, अशी माहिती एका रसवंती तथा सरबत चालकाने दिली.

Comments
Add Comment