Wednesday, April 30, 2025

देशमहत्वाची बातमी

देशात लवकरच समान नागरी कायदा : अमित शहा

देशात लवकरच समान नागरी कायदा : अमित शहा

भोपाळ (वृत्तसंस्था) : ‘आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. त्याची ब्ल्यू प्रिंटही तयार झाली आहे. राम मंदिर, कलम ३७०, तिहेरी तलाक अशा मुद्द्यांवर भाजपला यश मिळाले आहे. आता समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी सुरू झाली आहे’, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. भोपाळमध्ये भाजप कार्यालयात कोअर कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते.

शहा म्हणाले की, समान नागरी कायदा लागू करण्याची उत्तराखंडमध्ये तयारी करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून समान नागरी कायदा लागू करण्यात येत आहे. जांबोरी मैदानातही अमित शाह म्हणाले की, कलम ३७० असो, राम मंदिर असो किंवा अन्य कोणताही मुद्दा, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही वादग्रस्त मुद्दे सोडविले आहेत. आता संपूर्ण लक्ष देशभरात ‘समान नागरी कायदा’ लागू करण्यावर असणार आहे.

समान नागरी कायदा म्हणजे काय, यामध्ये विवाह, घटस्फोट, वारसाहक्क, दत्तक यांसारख्या सामाजिक विषयांसाठी देशात समान कायदे असणार आहेत. धर्माच्या आधारावर न्यायालय किंवा वेगळी व्यवस्था असणार नाही. घटनेच्या कलम ४४ साठी संसदेची संमती आवश्यक आहे. विशेष म्हणजे, स्वातंत्र्यापूर्वी हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळे कायदे लागू करण्यात आले होते. भाजपने आपल्या तीन मुख्य मुद्द्यांमध्ये त्याचा समावेश केला. भाजपच्या बैठकीत अमित शहा म्हणाले की, पराभवासाठी मोठ्या आणि जबाबदार नेत्यांना जबाबदार धरले जाईल.

Comments
Add Comment