मुंबई (प्रतिनिधी) : ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या एकतर्फी लढतीत शनिवारी सनरायझर्स हैदराबादने बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सवर ९ विकेट आणि १२ ओव्हर्स राखून मात केली. गोलंदाजांची सुरेख कामगिरी त्यांच्या सलग पाचव्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
बंगळूरुला ६८ धावांमध्ये रोखताना हैदराबादच्या बॉलर्सनी संघाचा मोठा विजय निश्चित केला. त्यानंतर ६९ धावांचे माफक आव्हान ८ षटकांत सलामीवीर अभिषेक शर्माच्या (२८ चेंडूंत ४७ धावा) बदल्यात पार केले. कर्णधार केन विल्यमसन १६ धावांवर नाबाद राहिला. तत्पूर्वी, मार्को जॅन्सेन, टी. नटराजन (प्रत्येकी ३ विकेट) जगदीश सुचितच्या (२ विकेट) भन्नाट गोलंदाजीसमोर बंगळूरुचा डाव १६.१ षटकांत ६८ धावांमध्ये आटोपला. त्यांच्याकडून सुयश प्रभुदेसाई (१५) आणि ग्लेन मॅक्सवेलचे (१२) सर्वाधिक योगदान राहिले. बंगळूरुचा माजी कर्णधार विराट कोहलीसह अनुज रावत आणि फॉर्मात असलेल्या दिनेश कार्तिकलाही खाते उघडता आले नाही. कर्णधार फाफ डु प्लेसिस ५ धावा काढून बाद झाला.
हैदराबादचा ७ सामन्यांतील हा सलग पाचवा विजय आहे. दहा गुणांसह त्यांनी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. ८ सामन्यांतील तिसऱ्या पराभवानंतरही बंगळूरु (१० गुण) चौथ्या स्थानी आहे.