Saturday, April 19, 2025
Homeक्रीडागुजरातचे पाऊल पडते पुढे

गुजरातचे पाऊल पडते पुढे

कोलकात्यावर मात करत अव्वल स्थानी झेप; हार्दिकची ‘कॅप्टन्स इनिंग’ निर्णायक

नवी मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे पाऊल पुढे पडत असल्याचे शनिवारी डी. वाय. पाटील स्टेडियमवर पाहायला मिळाले. चुरशीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सचा ८ धावांनी पराभव करत त्यांनी ७ सामन्यांतील सहावा विजय (१२ गुण) नोंदवत गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. कर्णधार हार्दिक पंड्याची ‘कॅप्टन्स इनिंग’ तसेच मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशिद खानची प्रभावी गोलंदाजी निर्णायक ठरली.

गुजरातचे १५७ धावांचे आव्हान कोलकात्याला पेलवले नाही. अष्टपैलू आंद्रे रसेलसह (२५ चेंडूंत ४८ धावा) रिंकू सिंगने (२८ चेंडूंत ३५ धावा) थोडा प्रतिकार केला तरी आघाडी फळीचे अपयश नाईट रायडर्सच्या पराभवाला कारणीभूत आहे. सॅम बिलिंग्ज (४) आणि सुनील नरिन (५) या बिनीच्या जोडीसह चौथ्या क्रमांकावरील नितीश राणाने (२) निराशा केली. कर्णधार श्रेयस अय्यरचीही (१२ धावा) खराब फॉर्मची मालिका कायम राहिली. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसह (२० धावांत २ विकेट) यश दयाल (४२ धावांत २ विकेट) आणि लेगस्पिनर राशिद खानने (२२ धावांत २ विकेट) प्रभावी गोलंदाजी करताना कोलकात्याला २० षटकांत ८ बाद १४८ धावांमध्ये रोखले.

तत्पूर्वी, कर्णधार हार्दिक पंड्या एकाकी लढला. त्याच्या ४९ चेंडूंतील ६७ धावांच्या चमकदार खेळीच्या जोरावर गुजरातला दीडशेपार मजल मारता आली. आयपीएलच्या १५व्या पर्वात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणारा हार्दिक पहिलाच कर्णधार ठरला. मात्र, त्याच्या संघाला दुसऱ्याच षटकात सलामीवीर शुबमन गिल (७) याला गमवावे लागले. वेगवान गोलंदाज टिम साऊदीने त्याला माघारी धाडले. त्यानंतर कॅप्टनने दुसरा सलामीवीर वृद्धिमान साहा (२५ धावा) आणि डेव्हिड मिलरला (२७ धावा) हाताशी धरून गुजरातचा डाव सावरला. हार्दिकने ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएल २०२२मध्ये तीन अर्धशतक झळकाणारा तो पहिला कर्णधार ठरला.

डेव्हिड मिलरने आक्रमक पवित्रात घेत आल्याआल्या षटकार खेचला. त्यानंतर वरुण चक्रवर्तीकडून सीमारेषेवर त्याचा झेल सुटला. मिलर व हार्दिकने तिसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूंत केलेली ५० धावांची भागीदारी टायटन्सच्या डावातील सर्वाधिक पार्टनरशिप ठरली. १७व्या षटकात शिवम मावीने ही डोईजड झालेली भागीदारी तोडली. मिलरने १ चौकार व २ षटकारांसह २७ धावा केल्या.

फलंदाजीतील भन्नाट फॉर्म कायम राखला तरी हार्दिक १०० टक्के फिट नाही. त्याने १७व्या षटकानंतर फिजिओकडून प्राथमिक उपचार घेतले. पुढच्याच षटकात टिम साऊदीने हार्दिकला बाद केले. हार्दिकने ४९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ६७ धावा केल्या. त्याच षटकात राशिद खानही ( ०) बाद झाला. त्यामुळे हार्दिकच्या कॅप्टन्स इनिंगनंतरही गुजरातची मजल २० षटकांत ९ बाद १५६ धावांपर्यंत गेली. कोलकाताकडून आंद्रे रसेल (४ विकेट) हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. साऊदीने ३ विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. गुजरातचा ७ सामन्यांतील हा सहावा विजय आहे. त्यांनी यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा विजयी हॅटट्रिक नोंदवली. तसेच १२ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिले स्थान पटकावले. कोलकाताचा आठव्या सामन्यातील हा एकूण पाचवा आणि सलग चौथा पराभव आहे. ताज्या गुणतालिकेत ते ६ गुणांसह सहाव्या स्थानी आहेत.

रसेलची (१-०-५-४) ऐतिहासिक बॉलिंग व्यर्थ

शेवटच्या षटकात केवळ पाच धावा देत चार विकेट घेत आंद्रे रसेलने इतिहास रचला. डावातील शेवटच्या ओव्हरमध्ये चार विकेट टिपणारा तो आयपीएल २०२२ इतिहासातील पहिलाच गोलंदाज ठरला. पहिल्या दोन चेंडूंवर रसेलने अभिनव मनोहर आणि लॉकी फर्ग्युसनला बाद केले. पाचव्या चेंडूवर त्याने राहुल तेवातियाची (१७) विकेटही घेतली. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर यश दयालची स्वत:च्याच गोलंदाजीवर भन्नाट कॅच घेतली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -