Friday, May 9, 2025

अग्रलेखसंपादकीयमहत्वाची बातमी

काँग्रेसचे मिशन २०२४

काँग्रेसचे मिशन २०२४

सुकृत खांडेकर


रणनितीकार म्हणून राजकीय पक्षांमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण केलेले प्रशांत किशोर हे यापुढे काँग्रेस पक्षाच्या रणनितीची आखणी करणार की, पक्षाचे संघटनात्मक पद स्वीकारून राजकारणात सक्रिय होणार, हे लवकरच स्पष्ट होईल. किशोर यांची गेल्या काही महिन्यांत काँग्रेस पक्षाशी जवळीक वाढली असून २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी ते पक्षाच्या प्रचाराच्या आखणीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असे संकेत मिळू लागले आहेत. गेले सहा महिने प्रशांत किशोर यांची काँग्रेस हायकमांडबरोबर चर्चा व मुलाखती चालू आहेत. अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील व २०२४ मधील लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरवतील, असे निकटवर्तींना सांगितले आहे. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशासंबंधी सोनिया गांधींशी चर्चा केली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही किशोर यांचा रणनितीकार म्हणून काँग्रेसला निश्चित लाभ होईल, असे म्हटले आहे.


प्रशांत किशोर यांना पक्ष संघटनेत कोणती जबाबदारी दिली जाईल, याविषयी गेले आठवडाभर पक्षात चर्चा चालू होती. त्यांच्याकडे सरचिटणीसपद सोपवले जाईल, असेही ऐकायला मिळते. निवडणुकीची रणनिती आणि समविचारी पक्षांबरोबर आघाडी करणे ही कामगिरी त्यांच्यावर सोपवली जाईल. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून काँग्रेस पक्षाला देशात झालेल्या बावीस विधानसभा निवडणुकीत आणि दोन लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळेच किशोर यांची रणनिती काँग्रेसला आवश्यक वाटू लागली. किशोर यांची प्रचाराची आखणी व अन्य राजकीय पक्षांशी संबंध जोडण्याची कला पक्षाला महत्त्वाची वाटू लागली आहे. काँग्रेस पक्षात प्रवेशानंतर किशोर यांच्यावर विधानसभा व लोकसभा निवडणुकीची रणनिती आखण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच विविध राज्यांचे जे प्रभारी असतील, त्यांच्याशी किशोर यांचा थेट संपर्क राहील.


सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतरचे पक्षीय बलाबल असे आहे.


एनडीएमध्ये भाजप - ३०३, जनता दल युनायटेड - १६, लोजप - ६. (शिरोमणी अकाली दलाचे २ खासदार आहेत, पण अकाली दल एनडीएमध्ये नाही.) यूपीएमध्ये काँग्रेस - ५५, द्रमुक - २४, राष्ट्रवादी काँग्रेस - ४, नॅशनल कॉन्फरन्स - ३.


याशिवाय लोकसभेत शिवसेना - १८, वायएसआरसीपी - २२ व तृणमूल काँग्रेस - २२ असे मोठे पक्ष आहेत. त्याशिवाय बसपा - १०, सपा - ५, बीजू जनता दल - १२, सीपीएम - ३, तेलंगणा राष्ट्र समिती - ९, आययूएमएल - ३, आप - १, एमआयडीएमके - २, असे बलाबल आहे. (पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर काही खासदारांनी राजीनामे दिले आहेत.)


आगामी निवडणुकांमध्ये भाजपला जिद्दीने टक्कर देण्यासाठी शक्तिशाली व विश्वासू मित्रपक्ष जोडले पाहिजेत, असे प्रशांत किशोर यांनीच म्हटले आहे. किशोर यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर ५२ स्लाइड्सचे सादरीकरण केले. त्यातील १८ स्लाइड्स या काँग्रेसच्या संवाद रणनितीविषयी आहेत. किशोर यांनी आपल्या सादरीकरणातून काँग्रेसमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत ३७० मतदारसंघ निवडून त्यावर लक्ष्य केंद्रित करावे. उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसामध्ये काँग्रेसने स्वबळावर लढावे आणि महाराष्ट्र-तामिळनाडूमध्ये प्रादेशिक पक्षांबरोबर आघाडी करून लढावे, अशी त्यांनी रणनिती मांडली आहे. कोणत्या राज्यात काँग्रेसचे संख्याबळ वाढू शकते, याविषयी त्यांनी १० स्लाइड्स सादरीकरणात मांडल्या आहेत. कोणत्या राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत, या विषयावर चार स्लाइड्स आहेत. ज्या चार-पाच राज्यांत आघाडी करून निवडणुका लढवता येतील, या विषयावर पाच स्लाइड्स आहेत. काही स्लाइड्स पक्षाची प्रतिमा कशी उंचावता येईल, याविषयी आहेत. काँग्रेसने आपल्या कम्युनिकेशन सिस्टिममध्ये बदल करणे जरुरीचे आहे, असेही किशोर यांनी सुचवले आहे. ज्या राज्यांत काँग्रेसची थेट भाजपशी थेट लढत आहे, तेथे पक्ष संघटनेच्या रचनेत बदल करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष असला पाहिजे, असे किशोर यांनी म्हटले आहे.


गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२१ मध्ये किशोर यांनी राहुल गांधी व प्रियंका वाड्रा यांची भेट घेतली होती. त्याचवेळी किशोर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार, अशी हवा निर्माण झाली होती. पण काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत एका बड्या लॉबीने विरोध केल्यामुळे किशोर यांचा प्रवेश लांबणीवर पडला. आता किशोर यांच्या प्रवेशावर हायकमांडने शिक्कामोर्तबही केले आहे. प्रशांत किशोर यांनी गेल्या दहा वर्षांत अनेक राष्ट्रीय व प्रादेशिक नेत्यांची राजकीय रणनिती ठरविण्याचे काम त्यांनी केले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री


एम. के. स्टॅलिन, महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, बिहारचे नितीशकुमार, आंध्र प्रदेशचे जगमोहन रेड्डी यांची रणनितीकार म्हणून भूमिका बजावली होती. किशोर यांच्याकडे आठ राज्यांच्या निवडणूक रणनिती आखणीचा अनुभव आहे. त्याचा लाभ काँग्रेसला होऊ शकेल, असे गांधी परिवाराला वाटू लागले आहे. किशोर यांनी भाजपबरोबरही काम केले आहे. काँग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. साठ दशकांहून अधिक काळ देशावर या पक्षाने सत्ता गाजवली. १३८ वर्षांत प्रथमच काँग्रेसला राजकीय रणनितीकाराची गरज भासू लागली आहे.


गेल्या दहा वर्षांत निवडणुकीचे तंत्र आमूलाग्र बदलले आहे. निवडणुका या व्यावसायिक पद्धतीने लढवल्या जात आहेत. सोशल मीडियाचा हत्यार म्हणून कौशल्याने वापर होत आहे. गेली अनेक वर्षे मोतीलाल व्होरा व अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे तारणहार म्हणून काम करीत होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची भूमिका बजावणारी पोकळी भरून काढणारे पक्षाला कोणी हवे आहे. प्रशांत किशोर ही जागा ते घेतील का? किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर अनेकांशी संघर्ष करावा लागणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, गुजरात, हरियाणा, पश्चिम बंगाल या राज्यांतून पक्षाचे केवळ दहा खासदार आहेत. या राज्यांत काँग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजी मोठी आहे. २०२४ पूर्वी ही गटबाजी संपुष्टात आणण्यात किशोर यांची रणनिती यशस्वी ठरेल काय? पक्षातील जी २३ हा ज्येष्ठांचा अशांत गट किशोर यांना स्वीकारेल का?, त्यांच्याशी किशोर हे जमवून घेतील का?, असे अनेक अंतर्गत अडथळे आहेत. त्यावर किशोर मात करू शकतील का?, हा मोठा प्रश्न आहे. मिशन २०२४ साठी प्रशांत किशोर यांची रणनिती हा काँग्रेसचा आधार आहे.

Comments
Add Comment