कोकणी बाणा : सतीश पाटणकर
भारतीय अर्थव्यवस्थेत सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. शेती क्षेत्रानंतर सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांवर बहुसंख्य भारतीयांचे जीवन अवलंबून असल्याचे दिसून येते. या उद्योगाला मोठ्या उद्योगांच्या तुलनेत भांडवल श्रम, जागा आणि तंत्रज्ञान कमी लागते. तरीही रोजगारनिर्मिती अनेक विविध वस्तू आणि सेवांचे उत्पादन निर्यात वृद्धी इत्यादी बाबतीत सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचे योगदान अनन्यसाधारण स्वरूपात दिसून येते. केंद्र सरकारने सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाचे महत्त्व लक्षात घेऊन सहकार्य, सवलती आणि प्रोत्साहन असे धोरण स्वीकारले आहे. देशाच्या आर्थिक विकासात ही याची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग टिकून राहणे आणि विकसित होणे गरजेचे आहे.
विपणन म्हणजे मालाची विक्री करणे. विपणन संकल्पनेत वस्तू कल्पना आणि सेवा यांची निर्मिती, किंमत निर्धारण, त्यांचा प्रसार आणि त्यांचे वितरण यांच्याशी निगडित नियोजन, कार्यवाही प्रक्रिया समाविष्ट होतात. ही एक आर्थिक प्रक्रिया आहे. विपणन संकल्पना हे व्यवसायिक तत्त्वज्ञान आहे. विपणनाच्या संकल्पनेची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढत आहे. विपणनामुळे वस्तू आणि सेवांच्या उपयोगांत वाढ होते. विपणनामुळे ग्राहकांच्या नेमक्या गरजा ओळखून वस्तू अगर सेवा यांचे उत्पादन केले जाते. गेल्या तीस वर्षांपासून जीएस वन जागतिक मानकांची निर्मिती व त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वितरण साखळीतील वापर यावर काम करत आहे. आज वैद्यकीय सेवा, खाद्यपदार्थ, पुस्तके, कपडे, संरक्षण सामग्री, ऑटोमोबाइल अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये बारकोडचा वापर केला जातो.
आजकाल जागतिकीकरणामुळे जगभरातील विविध खाद्यपदार्थ आपल्याला सहज उपलब्ध होत आहेत. जीएस वन बारकोड हे जागतिक स्तरावरील सर्वात सुप्रसिद्ध व मान्यताप्राप्त बारकोड आहेत. भारताने १९९६मध्ये जीएस वनचे अधिकृत सभासदत्व घेऊन जीएस वन इंडियाची स्थापना केली. जीएस वन ही ना नफा ना तोटा सहकारी तत्त्वावर उद्योजकांनी चालविलेली जागतिक अधिकृत संघटना आहे. त्यांचे मुख्य ऑफिस ब्रसेल्स, बेल्जियम व प्रिस्टन, न्यूजर्सी येथे आहे. आज जगातील १००पेक्षा जास्त देश त्यांचे सभासद आहेत. बारकोड हा उत्पादनाच्या वितरण साखळीचा (उत्पादकापासून ते ग्राहकापर्यंत) अविभाज्य घटक झाला आहे. हे जीएस वन हे जागतिक अधिकृत मानक असल्यामुळे उत्पादकाला आपले उत्पादन जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी सहज उपलब्ध करून देता येते. बारकोडचे उत्पादकासाठी अनेकविध फायदे आहेत ते असे – माहितीचे अचूक व जलद संकलन, उत्तम ट्रॅकिंग यंत्रणा (जगभरात कुठेही), वेळेची बचत (वस्तूंची यादी करणे), कमी मनुष्यबळ, कमीत कमी चुका, त्रुटी. पण तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या की, बारकोड हा कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नाही.
बारकोड हा आकडेवारी किंवा उत्पादनाविषयी माहिती लिहिण्याचा एक मार्ग आहे. हा बारकोड एखाद्या उत्पादनाची किंमत, त्याची मात्रा, कोणत्या देशाने बनविला, कोणत्या कंपनीने बनविला इत्यादींबद्दल संपूर्ण माहिती देते. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग घटकांना विपणनासाठी एम २ स्वरूपाची नोंदणी असलेल्या आणि बारकोड वापरासाठी जीएस १ इंडियाकडे नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग घटकांसाठी ही योजना आहे. विपणनासाठी सहकार्य केले जाते. या योजनेखाली बारकोडच्या वापरासाठी नोंदणी शुल्काचा परतावा दिला जातो. एक वेळच्या नोंदणी शुल्काच्या ७५ टक्के रकमेच्या परताव्यासाठी आर्थिक साहाय्य केले जाते. १ जानेवारी २००२ पासून हे साहाय्य केले जाते, तर दर वर्षीसाठीच्या शुल्कापैकी ७५ टक्के रक्कम पहिल्या तीन वर्षांसाठी १ जून २००७ पासून दिले जाते. हे शुल्क बारकोडच्या वापरासाठी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग घटकांना जीएस १ असते.
या योजनेअंतर्गत सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग घटकांना बारकोडच्या वापराबद्दल माहिती दिली जाते. यासाठी कार्यशाळांचे आयोजन केले जाते. तसेच बारकोडिंगच्या शुल्काचा परतावाही दिला जातो. www.gs1india.org या वेबसाइटवरून बारकोडसाठी नोंदणी केल्यानंतर खालीलप्रमाणे शुल्काचा परत ताबा मिळवता येतो. बारकोडच्या शुल्काचा परतावा मिळण्यासाठी विविध नमुन्यातील अर्ज तपशीलवार भरावा. हा अर्ज www.dcmsme.gov.in येथून डाऊनलोड करता येऊ शकतो. पूर्ण भरलेला आणि आवश्यक ते कागदपत्र जोडलेला अर्ज एमएसएमई विकास कार्यालयात सादर करता येईल. एमएसएमई कार्यालयाचे पत्ते www.dcmsme.gov.in /contacs येथे पाहता येतील.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)