डॉ. लीना राजवाडे
आपण जे अन्नपदार्थ खातो मग ते कोणत्याही प्रांतातले, कोणत्याही पद्धतीचे असो, त्याला एक विशिष्ट चव असते. या चवीलाच शास्त्रात रस अशी संज्ञा आहे. रसना म्हणजे आपली जिव्हा होय. या रसनेमुळे पदार्थाची चव समजते. कोणताही पदार्थ ज्या मूलभूत घटकांनी बनलेला असतो, त्याची चव किंवा रस असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. उदाहरणार्थ-पोळी ज्या गव्हापासून बनते, त्या गहू या घटकद्रव्याचा रस हा मधुर आहे. आपण जर नीट चावून पोळी खाल्ली, तर ही चव समजते. या ठिकाणी या आनुषंगाने आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. मधुर रस विशेषकरून गव्हासारखा शूकधान्य वर्गातला घटक हा शरीरात पचनानंतर नीट सात्म्य होण्यासाठी चावून खावा लागतो, पचायला तो जास्त वेळ लागतो. तेव्हा यानिमित्ताने लक्षात येईल की, गहू व इतर टरफल किंवा तूस फोडून बाहेर येणारी धान्ये यांच्यामधील Active principle किंवा तत्त्व मधुर रसाने काम करते. हे पदार्थ बनत असताना होणारे संस्कार याविषयी आपण लेखमालेत पुढे विस्ताराने समजावून घेऊच. इथे एवढी गोष्ट मात्र नक्की महत्त्वाची की, भारतीय वैद्यकशास्त्रात आहार विषय किती बारकाईने प्रयोगसिद्ध मांडला आहे. आताच्या काळात यावर संशोधन चालू आहे. पचन आणि आहार रस या तत्त्वाचा घनिष्ट संबंध मांडणारे भारतीय वैद्यकशास्त्र मात्र सिद्ध आहे. याचा आपण अभिमान ठेवूयात आणि जाणीवपूर्वक आपले स्वास्थ्य सांभाळण्याचा सजगतेने प्रयत्न करू यात.
आहारातील प्रमुख रस सहा आहेत –
मधुर (गोड), अम्ल (आंबट), लवण (खारट), कटू (तिखट), तिक्त (कडू), कषाय(तुरट).
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पाचही महाभुते कमी अधिक प्रमाणात या रसांमध्ये असतात.
मधुर रस यात पृथ्वी, आप म्हणजेच पार्थिव आणि जलीय अंश अधिक असतो. तसेच हा रस स्नेहयुक्त, पचायला हलका आहे. म्हणूनच योग्य प्रमाणात मधुर रसाचे द्रव्य पदार्थ खाल्याने शरीराला स्थैर्य मिळते.
गोड रसाचे पदार्थ जिभेला रुचकर लागतात. यापासून बनलेल्या पदार्थांचा वासही छान येतो. एकूणच मधुर रसाचे पदार्थ खाताना समाधान मिळते.
मधुर रसाचे पदार्थ खाल्ल्याने मन आणि ज्ञानेंद्रिय यांचे प्रसादन होते. कांती चांगली होते. दूध, तूप यांसारख्या मधुर पदार्थांचा आहारात प्रमाणात समावेश निश्चितच असायला हवा.
मधुर रसाचे पदार्थ खूप खाल्ल्याने माणूस लठ्ठ होतो. याचे कारण यातील घन आणि द्रव अंश शरीरात प्रमाणाबाहेर साठतो. विशेषकरून गळा, मान या ठिकाणची चरबी अधिक प्रमाणात वाढते. गळ्याला सूज येते, घशात गाठी होतात.
तेव्हा आहारात या मधुर रसाचा प्रमाणात समावेश केल्यास आबालवृद्धांना जीवनात स्थैर्य लाभेल, ताकद टिकून राहील. त्वचा, केस यांचेही आरोग्य चांगले ठेवण्यासही मदत होईल.
मधुर रसाचे पदार्थ तूप, मध, तेल, दूध, मांस, उसापासून बनणारे पदार्थ (साखर, गूळ), मनुका, अक्रोड, शिंगाडा, खजूर, केळे, फणस, चारोळी, ताडगोळा, फालसा, शतावरी.
आजन्म सात्म्यात् कुरूते धातुनां प्रबलं बलम्
जन्मापासून सात्म्य असल्याने मधुर रस हा शरीराला धारण करणाऱ्या सर्व धातूंना उत्तम ताकद देतो.
आजची गुरुकिल्ली
नेहमी जेवणात सर्व रसांचा समावेश करावा.
पुढील लेखात इतर रसांविषयी माहिती घेऊ.