Tuesday, December 10, 2024

अग्निकन्या

अर्चना सोंडे

आग से खेलनेवाले अंगारो पे चलने से नही डरते” कोणत्यातरी सिनेमातला हा डायलॉग पहिल्यांदा ऐकला आणि हसूच आलेलं. मात्र हा डायलॉग शब्दश: जगणाऱ्या रितूला भेटले आणि स्तब्धच झाले. रितू अरविंद भोंगळे, ग्रेट फायर सेफ्टी सोल्यूशन्स या कंपनीची संचालिका. आगीशी दोन हात करणे हा तिचा व्यवसाय. आगीसारखीच तिच्या उद्योजक प्रवासाची कथासुद्धा ज्वलंत आहे.

रितूचा जन्म नायगाव मुंबईचा. मात्र बालपण आणि शिक्षण पुण्यात झालं. रितूचे बाबा प्रभाकर घोक्षे, तर आई जयश्री प्रभाकर घोक्षे. प्रभाकर घोक्षे यांनी आयुष्यात कधीच नोकरी केली नाही. ते कंत्राटी तत्त्वावर मजूर पुरवत. संपूर्ण पुण्यात प्रभाकर घोक्षे यांचा या व्यवसायात दबदबा होता. रितूसाठी तिचे बाबा एक आदर्शच आहेत. पुण्याच्या पी.ई.एस मॉर्डन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कॉलेजमधून तिने संगणक विषयाची अभियांत्रिकी पदवी मिळवली. दरम्यान रितूच्या बाबांनी अग्निसुरक्षा क्षेत्रातील नवीन कंपनी सुरू केली होती. रितू शिक्षण घेत असतानाच कंपनीकडे देखील लक्ष द्यायची. तांत्रिक शिक्षण गाठीशी असल्याने अल्पावधीतच अग्निसुरक्षा संदर्भातील साऱ्या तांत्रिक बाबी रितूला अवगत झाल्या. एक प्रकारे अग्निसुरक्षा विषयातील ती तज्ज्ञच बनली, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने बाबांच्या फायर सेफ्टी व्यवसायात पूर्णपणे उतरायचं ठरवलं. सर्वप्रथम शासकीय परवाना काढला. अगदी शुन्यातून सुरुवात केली. दरम्यान रितूचा अरविंद भोंगळे या होतकरू उद्योजक तरुणासोबत विवाह झाला. रितूने उद्योजिका बनण्याचे निश्चित केले. बाबा तर पहाडासारखे उभे होतेच. पण आता अरविंदसारखा आयुष्याचा जोडीदार व्यावसायिक भागीदार देखील झाला. त्यामुळे उद्योगाची गाडी जोराने धावू लागली. इमारतींमध्ये अग्निरोधक प्रणाली बसविणे, त्याची डागडुजी करणे. अग्निसुरक्षेसंबंधी प्रशिक्षण देणे इ. कामे रितूची ग्रेट फायर सेफ्टी सोल्युशन्स करू लागली. अगोदर ओळखीने कामं मिळाली, ती कामे उत्तम दर्जाची केल्याने त्याची मौखिक जाहिरात आपोआप झाली. या मौखिक जाहिरातीचा फायदा असा झाला की, अनोळखी लोकांकडून कामे मिळू लागली.

सध्या ग्रेट फायरकडे १५ ते २० कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना संपूर्ण तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येते. “आपला कर्मचारी हा आपल्या संस्थेचे प्रतिनिधित्व करत असतो. म्हणूनच आम्ही कर्मचाऱ्यांना दर्जात्मक प्रशिक्षण देतो. सर्वप्रथम मी कोणतीही गोष्ट शिकते आणि मग माझ्या सहकाऱ्यांना शिकवते. मला वाटतं आपल्याला आपल्या सहकाऱ्याकडून जे अपेक्षित असतं, त्याचं जुजबी ज्ञान तरी आपल्याला असणे आवश्यक आहे. जेणेकरून आपण त्यांच्या माध्यमातून क्लायंट्सना उत्तम सेवा देऊ शकतो. यामुळे संघभावना प्रबळ होते.” असे रितूला वाटते. पुरवठादार, अकुशल कामगार. कुशल कामगार या सर्वांसोबत रितू स्वत: संवाद साधतात. कंपनीच्या अकाऊंटचे काम जातीने पाहतात. आपल्या कर्मचाऱ्यांची मायेच्या ममतेने काळजी घेतात. त्यामुळे त्यांचा कर्मचारी वर्ग या जोखमीच्या कामात स्वत:ला झोकून देऊन काम करतो.

ग्रेट फायर सेफ्टी सोल्युशन्स ही कंपनी नसून आता एक कुटुंबच बनले आहे. रितू यांच्या बाबांचे किराणा आणि भाजीपाल्याचे दुकान होते. त्यामुळे उद्योग व्यवसाय हे रितूसाठी काही अवघड काम नव्हते. “आपण जर उद्योगात आलो नसतो, तर संगणक अभियंता म्हणूनच नोकरी केली असती. कारण त्यात माझं खरं शिक्षण झालंय,” असं रितू आवर्जून नमूद करतात.

देशात आगीचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे हकनाक बळी जातात, आर्थिक नुकसान होते ते वेगळेच. आग लागण्याची कारणे विविध असली तरी आग लागल्याचे फक्त समजले तरी माणूस घाबरून जातो. त्या क्षणी नेमकं काय करावं हेच त्याच्या ध्यानी येत नाही. मात्र अरविंद भोंगळे यांना याची जाणीव झाली.

आपल्या भारतीय समाजामध्ये आगीविषयी जे गैरसमज झाले ते दूर करण्यासाठी भोंगळे महाराष्ट्राच्या विविध भागांत शिबिरे घेणार आहेत. या कामी रितू त्यांना मदत करणार आहे. आगीमुळे होणाऱ्या अपघातापासून रोखण्यासाठी आपल्या देशबांधवांना प्रशिक्षित करण्याचं ध्येय बाळगणाऱ्या या अग्निकन्येला मनापासून शुभेच्छा.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -