लातूर (प्रतिनिधी) : सत्तेचा माज चढला की, निर्बंध लादले जातात अशी टीका ज्ञानपीठ विजेते कादंबरीकार दामोदर मावजो यांनी व्यक्त केली. अशा वेळी साहित्यिक गप्प का बसतात? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
लातूरच्या उदगीर नगरीत ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना सुरुवात झाली आहे. छत्रपती शाहू महाराज सभागृहात व डॉ. ना.य. डोळे व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते सकाळी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. उद्घाटनापूर्वी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी चौकातून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानपीठ विजेते कादंबरीकार दामोदर मावजो यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी परखड मत मांडले. आज साहित्यिकांमध्येहेही चिअर लीडर्स तयार झालेत. ते सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीला गुमान प्रोत्साहन देतात, अशी खंतही दामोदर मावजो यांनी बोलून दाखवली. “आपल्या देशात विशिष्ट विचारधारेचा प्रचार फैलवण्याचा प्रयत्न काही घटकांकडून होत आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. असे पुढे घडत राहिले तर चौथा स्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती साहित्य संमेलनाच्या मंचावरून शरद पवारांनी व्यक्त केली.
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांचे भाषण झाले. कोरोनाने आपल्याला हात धुवायला शिकवले. पण ज्यांच्या हाताला रक्त लागले आहे किंवा पापाचा स्पर्श झाला आहे, ती मंडळी शेक्सपिअरच्या त्या नाटकातल्याप्रमाणे ‘वॉश माय हँडस्’ असं म्हणतदेखील नाहीत. लेखक हे पाहतो आहे. आठवतो आहे. पण हे आठवलेलं त्याने सांगितलं मात्र पाहिजे. तेव्हा, लेखकाची भूमिका काय असते, तुमची भूमिका काय आहे असे प्रश्न तुम्ही मला विचारता म्हणून तुम्हाला मी हे विस्तारने सांगितलं. तुमच्या आणि माझ्या मनात-मेंदूत दडलेला सामान्य माणूस निर्भयतेने जगायला लागेल तेव्हा अच्छे दिवस येतील, असा विश्वास ससाणे यांनी व्यक्त केला. एकूण उदासीनतेबाबत अधिक जाणकारांनी बोललं पाहिजे. काही टीकाकारांनी असं दाखवून दिलं आहे की, मराठी साहित्याचं विश्व नेहमीच कर्मठ, स्थितीवादी, आत्मकेंद्री व वास्तवाची दखल न घेणारं असं राहिलं आहे. टीका अशी आहे की, स्वातंत्र्यसंग्रामाबाबत मराठी साहित्यविश्वात विशेष असं काही लिहिलं गेलं नाही. महात्मा गांधींच्या खुनाच्या घटनेचे पडसाद देखील मराठी साहित्यात विशेष उमटलेले नाहीत. महात्मा गांधींचं योग्य ते आकलनच मराठी साहित्याला व साहित्यिकांना नीटसं झालेलं नाही, अशी टीका केली गेली आहे. देशातील मोठ्या समूहाने धर्मांतर करणं, १९७२ चा मोठा दुष्काळ व त्यानिमित्ताने शेतकऱ्याचं उद्ध्वस्त होणं या घटनादेखील मराठी साहित्यात आल्या नाहीत असेही ससाणे म्हणाले.