
- सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा असल्याने लोडशेडिंग नको...
- वीज, कोळसा खरेदीत घोटाळा झाल्यास पेनड्राइव्ह निघतील
संतोष राऊळ
कणकवली : ‘सत्तेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे लोडशेडिंग हे ठरलेले आहे. महाराष्ट्र राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांच्या राजवटीत पुन्हा वीजटंचाई सुरू झाली. नियोजनशून्य कारभारामुळे हे होत आहे. लोडशेडिंगबाबत विचारणा केल्यावर हे लोक केंद्राकडे बोट दाखवतात. हा निर्लज्जपणा आहे. लोडशेडिंगचे संकट महाविकास आघाडी सरकारचेच आहे’, असा घणाघाती आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.
कणकवली ‘प्रहार भवन’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोडशेडिंगबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उदाहरण पाहिल्यास फिडरप्रमाणे होत असले तरी नियोजन असते, तर वेगळी परिस्थिती असती. महाविकास आघाडीचे सरकार संकटाची पूर्वतयारी करत नाहीत. कोरोनातदेखील नियोजन नसल्याने राज्यात धोका निर्माण झाला होता. राज्य सरकारचा कोणत्याही संकटात फक्त केंद्राकडे बोट दाखवणे हा एककलमी कार्यक्रम असून हे दुर्दैव असल्याचा टोला आमदार राणे यांनी लगावला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायास आता कुठे गती येत होती. जिल्ह्यातील व्यापारी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. पर्यटन मंत्री जिल्ह्यात येऊन गेले. लोडशेडिंगमुळे येथे पर्यटक कसे थांबणार? याचे उत्तर पर्यटनमंत्री, पालकमंत्री व सत्ताधारी आमदारांनी दिले पाहिजे. येथे पर्यटनाचे पट्टे आहेत. त्यांना वीज नसेल, तर काय उपयोग? येथील आर्थिक स्थिती नुकतीच सुधारत असताना हे लोडशेडिंग सुरू झाले. मग पर्यटक कसा थांबणार? त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून स्पेशल केस का नाही? इथे विजेचे जास्त नियोजन का होत नाही?
राज्यातील पर्यटन वाढवायचे असेल, तर सरकारने वेगळे नियोजन करावे. तसे निकष करावेत, राज्यातील मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. पैसे खाऊन स्वतःचे भविष्य उज्ज्वल करीत आहेत. केंद्रामुळे लोडशेडिंग होत नाही. राज्याने नियोजन केले नसल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने हे संकट निर्माण केले आहे. आता राज्य सरकार वीज खरेदीच्या व कोळसा खाणी घेण्याच्या मूडमध्ये आहे.
तेव्हा भ्रष्टाचार होणार, हे सांगायला नको. जेव्हा हे लोक काही खरेदी करतात, तेव्हा भ्रष्टाचार करतात... हे कोरोना काळातील झालेल्या घोटाळ्यात, जाधव, मंत्री परब यांच्या केसमधून जगाला कळले आहे. वीज, कोळसा खरेदीत घोटाळा झाल्यास उद्या पेनड्राइव्ह निघतील, असा टोला आ. नितेश राणे यांनी लगावला. जिल्ह्यात वीज लोडशेडिंग काळात पत्रकार कर्तव्य बजावत असताना ३५३ गुन्हे दाखल होत असतील, तर त्याविरुद्ध आवाज उठवणार आहोत. हा माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रावणाच्या तोंडाप्रमाणे शिवसेनेचे १० पालकमंत्री
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक पालकमंत्री नाही, तर रावणाच्या तोंडाप्रमाणे १० पालकमंत्री आहेत. पालकमंत्री उदय सामंत आहेत कुठे? लोडशेडिंगचे नियोजन नाही की कोरोनाचा बुस्टर डोस देण्याचे नियोजन नाही. पालकमंत्र्यांनी जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. कोरोना पुन्हा वाढत आहे, बुस्टर डोस किती लोकांनी घेतला आहे, जास्तीत-जास्त लोकांना डोस देण्यासाठी नियोजन केले पाहिजे. मात्र तसे काहीच होत नाही. किरण सामंत अधिकाऱ्यांना फोन करतात आणि कामे करतात. त्यामुळे किरण सामंत यांना अधिकृत पालकमंत्री बनवा, असा चिमटा आ. नितेश राणे यांनी काढला आहे.