मुंबई (प्रतिनिधी) : ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याचा हट्ट अखेर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याला महागात पडला आहे. खार पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कलम १५३ (अ) अंतर्गत कारवाई करत, गुन्हा दाखल केला आहे. त्याशिवाय आणखी काही कलमे देखील लावण्यात आली आहेत. न्यायालयात त्यांना उद्या रविवारी हजर केले जाणार आहे. त्यामुळे शनिवारची रात्र त्यांना तुरुंगातच काढावी लागली. समाजात तेढ निर्माण होईल असे वर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठणाच्या मुद्द्यावरून वांद्रे आणि खार परिसरात गेल्या २४ तासांपासून चाललेल्या हायव्होल्टेज नाट्याला राणा या दाम्पत्याच्या अटकेनंतर पूर्णविराम मिळाला. मुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपटलेल्या राणा दाम्पत्याचा शिवसैनिकांनी रस्ता अडवून धरला होता. अखेर प्रचंड पोलिस बंदोबस्तात श्री व सौ. राणा यांना सायंकाळी खार पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी शिवसैनिकांपासून वाचविण्यासाठी राणा दाम्पत्याला ज्या गाडीतून पोलीस स्टेशनला आणले गेले, त्या गाडीच्या काचांवर पडदे टाकण्यात आले होते. जेणेकरून शिवसैनिकांची नजर त्यांच्यावर पडू नये व त्यांनी कोणतीही आक्रमक भूमिका घेऊ नये. तसेच राणांनीही गाडीतून कोणतेही इशारे करू नये, असे सांगण्यात आले होते. सुमारे साडेपाचच्या सुमारास प्रचंड बंदोबस्तात पोलीस राणांना घेऊन खार पोलीस ठाण्याकडे रवाना झाले. यावेळी राणांच्या गाडीमागे काही शिवसैनिक धावून गेले. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्याने राणा दाम्पत्यास सुखरूप पोलीस स्टेशनला नेण्यात आले.
तत्पूर्वी, राणांच्या खार येथील घराबाहेर शेकडो शिवसैनिकांनी गर्दी केली होती. माफी मागितल्याशिवाय त्यांना घराबाहेर पाऊल टाकू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. जोपर्यंत राणा दाम्पत्य शिवसेनेची, उद्धव ठाकरे यांची माफी मागत नाही, तोपर्यंत त्यांना आम्ही सोडणार नाही, अशी आक्रमक भमिका शिवसैनिकांनी घेतल्याने राणांच्या घराच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. शिवसैनिकांची गर्दी असल्याने पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारीही राणांच्या घराखाली येऊन थांबले होते. वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी तेथील सुरक्षेचा आढावा घेत होते. अखेर, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस राणांना घेऊन खार पोलीस ठाण्यात गेले. न्यायालयात हजर करण्याअगोदर त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
राणा यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याच्या केलेल्या घोषणेनंतर राज्यभरात मागील दोन दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले होते. शिवाय, राणा दाम्पत्य अमरावतीवरून मुंबईत देखील आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारनंतर शनिवार सकाळपासूनच शिवसेना कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर आणि नवनीत राणा यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर राणा दाम्पत्याने आम्ही मातोश्रीवर जाणार नसल्याचे सांगत, आपले आंदोलन रद्द केले. त्यांनी तशी घोषणा देखील केली.
राणा दाम्पत्याची थेट उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब यांच्याविरोधात तक्रार
राणांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात तक्रार केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि शेकडो शिवसैनिकांच्या विरोधातही तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांनी शिवसैनिकांना चिथावल्याचा आरोप या तक्रारीतून राणांनी केला आहे. तसेच, घराखाली गोंधळ घालणाऱ्या ५०० ते ६०० शिवसैनिकांविरोधातही तक्रार दाखल केली आहे. घराबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी शिवीगाळ आणि धमक्या दिल्या, बॅरिगेड्स तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केला. जीवे मारण्याच्या उद्देशाने शिवसैनिक घरात घुसले त्यामुळे ‘सिल्व्हर ओक’ हल्ला प्रकरणातील कलमे त्याच्याविरोधात लावण्यात यावीत अशी मागणी राणांनी केली.
आम्ही आंदोलन संपवतोय… राणांची घोषणा
शनिवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणा दाम्पत्याने आंदोलन थांबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘राज्यात पोलिसांना, सामान्य जनतेला त्रास होऊ नये आणि रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रस्तावित मुंबई दौरा रद्द होऊ नये यासाठी आम्ही आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे”, असे रवी राणा यांनी सांगितले.
इतका सत्तेचा माज? निव्वळ लज्जास्पद देवेंद्र फडणवीस यांचा संताप
राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. महिला लोकप्रतिनिधीला २० फूट गाडण्याची भाषा केली जात आहे, त्याची साधी दखलसुद्धा नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. इतका द्वेष आणि इतका सत्तेचा माज का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. फडणवीस ट्वीट करताना म्हणाले की, ‘इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? इतका द्वेष? सत्तेचा इतका माज? सरकारच करणार हिंसाचार, एवढीच तुमची मदुर्मकी? सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या, पण जनता सारे काही पाहते आहे. निव्वळ लज्जास्पद. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला आहे का?’
हंगामा नको: गृहमंत्री
‘मातोश्री’समोर हायहोल्टेज ड्रामा सुरू असताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शिवसैनिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले, तर राणा दाम्पत्याला हंगामा करू नका. पोलिसांना सहकार्य करावे, असे ते म्हणाले. राणा दाम्पत्याला विनंती आहे की, कुणाच्या सांगण्यावरून विनाकारण हंगामा करू नये.
कायदा सुव्यवस्था कशाला हातात घेता? : चंद्रकांत पाटील
राणा यांनी मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणण्याचे आव्हान दिल्याच्या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. स्वागत करायचे नसेल, तर कार्यकर्ते गोळा करून कायदा सुव्यवस्था कशाला हातात घेता? असा सवाल पाटील यांनी केला. ‘समजा मातोश्रीवर येणार असतील, तर मातोश्रीच्या प्रमुखांनी तक्रार द्यायची असते की, मला सुरक्षा पुरवा. पोलीस सुरक्षा देत असतात. मोहित कंबोज हल्ला प्रकरण, पोलखोल यात्रेवर झालेली दगडफेक आता राणा प्रकरण पाहता कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे.