डॉ. उदय निरगुडकर, राजकीय विश्लेषक
कोल्हापूर पोटनिवडणूक निकालाचे येणार्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांंवर निश्चित परिणाम होणार असून पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग येणं स्वाभाविक आहे. त्यामुळे ‘हीच ती वेळ, हाच तो क्षण’ याची जाणीव अनेक अस्वस्थ आत्म्यांना या निवडणूक निकालामुळे झाली. २०२४ मध्ये महाविकास आघाडी एकत्र राहिली तर तिकिटीचं वाटप ही विलक्षण कसरतीची गोष्ट असणार. या कसरतीची झलक आता येत आहे.
कोल्हापूरमध्ये प्रतिष्ठेची पोटनिवडणूक पार पडली. निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला. २०१९ मध्ये शिवसेनेच्या या पारंपारिक जागेवर विधानसभेसाठी कॉंग्रेसने चंद्रभान जाधव या व्यावसायिकाला, नवख्या राजकारण्याला उमेदवार म्हणून मैदानात उतरवलं. ती जागा राजेश क्षीरसागर या शिवसेनेच्या मातब्बर उमेदवाराने अनेकदा जिंकली होती. अर्थातच त्यामुळे तिथे प्रस्थापितविरोधी वातावरण होतं. शिवाय संघटनेतही काही कुरबुरी होत्या. त्यावर मात करणं क्षीरसागर यांना जमलं नाही. आणि क्षीरसागरांचा, पर्यायाने शिवसेनेचा पराभव झाला. कोल्हापूर जिल्हा संघटनदृष्ट्या शिवसेनेने उत्तम बांधला. ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेत इथून शिवसेनेचं प्राबल्य जाणवत राहिलं. अर्थात त्याआधी सद्दी कॉंग्रेसची होती. त्यांच्यामागे साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या, दूध डेअर्या, शिक्षण संस्था असं संघटनांचं जाळं होतं. १५ वर्षं सत्ता असूनही शिवसेनेला तसं जाळं उभं करता आलं नाही. तरी कोल्हापूर दक्षिण हा मतदारसंघ कुणाचा असं विचारलं तर त्याचं उत्तर शिवसेना हेच यायचं. अपवाद २०१९ चा. अर्थात २०१४ मध्ये सर्वच पक्ष वेगवेगळे लढले. स्वतंत्रपणे लढून भारतीय जनता पक्षाला ४३ हजार मतं पडली. स्वतंत्र आणि एकत्र अशा दोन्ही लढतींमध्ये शिवसेना आणि हिंदुत्ववाद्यांची मतं वेगळी करता येणार नाहीत कारण ते आत्ता आत्तापर्यंत तसं एकजीव होतं. आता महाविकास आघाडीत आल्यावर आघाडी हा धर्म झाला. अर्थातच हिंदुत्व दुय्यम झाल्याची भावना पसरली. असो.
कॉंग्रेसच्या ऍक्सिडेंटल आमदाराचं दुर्दैवी निधन झालं तरी पोटनिवडणुकीत ही जागा शिवसेनेला मिळाली नाही. त्यांच्या पत्नी कॉंग्रेसतर्फे उभ्या राहिल्या. खरं तर त्या भाजपच्या नगरसेविका. भाजप इथे संघटनशून्य. त्याचं कुठलंच राजकीय प्रतिनिधीत्व नाही. त्यामुळे राजकीय कामही शून्य. संस्थात्मक जाळं नाही. मग पन्नाप्रमुख शक्तीकेंद्र तर दूर की बात. समोर गाठ मात्र आर्थिक आणि संघटनदृष्ट्या अत्यंत संपन्न असलेल्या सतेज पाटील यांच्याशी. त्यांच्याकडे गृहराज्यमंत्रीपद, हाताशी संस्थात्मक जाळं, असंख्य माणसं जोडलेली, निवडणूक जिंकण्याचा दांडगा अनुभव आणि साम-दाम-दंड-भेद वापरण्याची क्षमता. अशी विषम कुस्ती कोल्हापुरात रंगली. भाजपने इथे अत्यंत विचारपूर्वक हिंदुत्वाची खेळी केली. लक्षात घ्या, प्रचारकाळात कोल्हापूरमध्ये ‘काश्मिर फाईल्स’चे शो हाऊसफुल्ल गर्दीत सुरू होते. २ लाख ९० हजारांचा मतदारसंघ. ६०-६५ टक्के मतदानाची परंपरा. म्हणजे दोन लाखाच्या आसपास मतदान होणार. लढत दुरंगी. बाकीचे नगण्य पाच-दहा हजारात आटोपणार. म्हणजे लाखाच्या अधिक जवळ जो पोहोचेल तो आमदार होणार, अशी दुरंगी लढत. एका बाजूला तीन भिन्न विचारसरणी आणि त्याहीपेक्षा सतेज पाटलांचं स्वत:च निवडणूक जिंकण्याचं व्यवस्थापन तर भाजपकडे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा आणि कार्यकर्त्यांची फौज.
पंढरपूरची पोटनिवडणूक भाजपचे समाधान औताडे जिंकले आणि विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन कोल्हापुरात महाराष्ट्र पादाक्रांत करण्यासाठी अंबाबाईचा आशीर्वाद घ्यायला भाजप उत्सुक. दुसरीकडे, महाविकास आघाडीत एकत्र राहिलो तर भाजपचा पराभव करू शकतो या प्रयोगाची इथे चाचणी होणार होती. प्रचाराला सुरुवात झाली तेव्हा जवळपास ३० टक्के मतं कुंपणावरची. सेना संघटन संभ्रमीत. कालपर्यंत आपला असलेला मतदारसंघ आपणच पुन्हा कष्ट करून पारंपारिक विरोधक असलेल्या कॉंग्रेसच्या दावणीला बांधायचा हे काही पटत नव्हतं. पण तिथे मनं आणि मनगटं आदेशावर चालतात. शिवसेना या निवडणुकीत नेमकी कशाकरिता, या प्रश्नाचं उत्तर पुढे सतरंज्या उचलाव्या लागल्या तरी बेहत्तर पण आज भाजपचा पराभव करण्यासाठी, असं येतं. त्यामुळे २०२४ मध्ये तिथे कॉंग्रेसचे मालोजीराजे उमेदवार असणार हे उघड आहे आणि सतेज पाटील कदाचित लोकसभासुद्धा पदरात पाडून घेतील. या निवडणुकीमध्ये २०१४ च्या मतसंख्येच्या तुलनेत भाजपने दुपटीनं वाढ केली आणि एकत्र राहिलो तर भाजपचा पराभव करू शकतो हा विश्वास आघाडीला मिळाला. एक प्रकारे अंबाबाईने दोघांना आशीर्वाद दिलाय. भाजपला हिंदुत्वाचा आणि आघाडीला एकत्र राहण्याचा. आता हा शाप की वर ते काळ ठरवेल. या निवडणुकीमध्ये मुस्लिमबहुल वस्त्यांमधल्या बुथवर भाजपला कुठेही तीन आकडी मतं पडली नाहीत. भाजपला अपेक्षित होतं, तिथे मतदानाची टक्केवारी घसरलेली.
मग या निकालाचे महाराष्ट्राच्या येणार्या लोकसभा-विधानसभांवर काही परिणाम होणार आहेत का? तर हो, निश्चित होणार आहेत. त्या तुम्हा-आम्हाला जेवढ्या जवळ अथवा दूर वाटताहेत, त्यापेक्षा आमदार-खासदारांना, इच्छुकांना, त्यांना पाडण्याची अनिवार्य इच्छा असणार्यांना जवळ दिसताहेत. त्यामुळे या निकालानंतर पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग येणं स्वाभाविक आहे. २०१९ च्या निवडणुकीचे निकाल स्पष्ट दर्शवतात की जे आयत्या वेळी मेगाभरतीत भाजपमध्ये आले त्यांना संमिश्र यश मिळालं. जे आधी आले त्यांच्यात निवडून येण्याचं प्रमाण अधिक आहे. हा धागा जर २०२४ पर्यंत नेला तर ‘हीच ती वेळ, हाच तो क्षण’ याची जाणीव अनेक अस्वस्थ आत्म्यांना या निवडणूक निकालामुळे झाली असणार यात शंकाच नाही. २०२४ मध्ये महाविकास आघाडी एकत्र राहिली तर तिकिटीचं वाटप ही विलक्षण कसरतीची गोष्ट असणार. अर्थात जो जिथून निवडून आला तो पक्ष अथवा उमेदवार इथून पुन्हा लढण्यावर हक्क सांगणार हे उघड आहे.
मग बुलढाण्याचं काय करायचं? तिथे शिवसेनेचे प्रतापराव जाधव निवडून आले. आणि राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे पडले. तीच गोष्ट रामटेकची. २०१९ चे कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार शिवसेनेच्या कृपाल तुमाने तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है असं म्हणणार का? यवतमाळ-वाशिममध्ये तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेच पराभूत झालेले. ते आता भावना गवळींचा प्रचार करतील का? हिंगोलीत कॉंग्रेसचे सुभाष वानखेडे ‘आवाज कुणाचा’ या आरोळीला ‘शिवसेनेच्या हेमंत पाटलांचा’ असं उत्तर देणार आहेत का? परभणीची जागा राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडीमुळे थोडक्यात हरलेली. इथे प्रश्न कसा सोडवणार?
नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे समीर भुजबळ शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांचा प्रचार करताहेत हे चित्र कसं दिसेल? ठाण्यात आणि कल्याणमध्ये एनसीपीचे जितेंद्र आव्हाड शिवसेनेचा प्रचार करताहेत यावर शिवसैनिक विश्वास ठेवतील का? मुंबई दक्षिणमध्ये २०२४ मध्ये कॉंग्रेसच्या मिलिंद देवरांनी शिवसेनेच्या अरविंद सावंतांचा प्रचार केला आणि निवडून आणलं तर त्यांचं करिअरच संपेल. तीच गोष्ट रायगडमध्ये अनंत गीतेंची. शिवेसनेने फार थोड्या फरकाने एनसीपीच्या तटकरेंसमोर हार पत्करली. आता आणखी पाच वर्षं वाट पहायला लागली तर गीतेंचा राजकीय प्रवास संपलाच म्हणायला हवा. मावळमध्ये आपल्या मुलाचा पराभव विसरून अजितदादा श्रीरंग बारणेंचा प्रचार करणार का? शिरूरमध्ये आजवर शिवाजीराव आढळराव पाटील या एकाच वाघाची डरकाळी होती. आता २०२४ ला अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ निवडून आणण्यासाठी पाटलांच्या हाताला बांधलेलं शिवबंधन कसं तयार होणार? तीच गोष्ट शिर्डीची. तीच गोष्ट सातार्याची. हातकंणगल्यात तर महाविकास आघाडीचे घटक राजू शेट्टी यांनी सगळा रागरंग ओळखून आताच भाजपबरोबर सोयरीकीच्या गोष्टी सुरु केल्या आहेत.
हे झालं लोकसभेचं. विधानसभेला शिवसेनेने जिंकलेल्या ५६ पैकी १४ जागा या कॉंग्रेसच्या विरोधात आणि १८ जागा राष्ट्रवादीच्या विरोधात आहेत. एनसीपीने जिंकलेल्या ५४ पैकी तब्बल २२ जागा शिवसेनेच्या वाघाचे दात मोजून खेचून काढल्या आहेत. कॉंग्रेसच्या ४४ पैकी १७ जागांवर त्यांचे उमेदवार शिवसेनेला पराभूत करून विजयी झालेत. या ५३ जागांवर नेमके काय निकष लावणार? अनेक ठिकाणी लोकसभा आणि त्यात असणार्या विधानसभा मतदारसंघात असे पेच आहेत. तिथे आघाडीचे दोन पक्ष सफाचट होणार. भरीस भर म्हणून भाजप ५०हून अधिक जागांवर दुसर्या क्रमांकावर आहे. भाजपने जिंकलेल्या १०५ जागांमध्ये आमचा वाटा मोठा होता, त्यामुळे ती जागा आम्हालाच मिळाली पाहिजे, अशी रास्त भूमिका शिवसेना मांडणार. तर तिथे आम्ही दुसर्या क्रमांकावर आहोत म्हणून ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे, असा शड्डू कॉंग्रेस-एनसीपी ठोकणार. त्यात काही प्रतिष्ठीत लढती. आता शिवसेनेच्या सुनील प्रभूंनी एनसीपीच्या विद्या चव्हाण यांचा पराभव केला आहे. ती जागा एनसीपी सोडणार का? शिवसेनेच्या सुहास कांदे यांनी एनसीपीच्या पंकज भुजबळ यांना धूळ चारली. मग नांदगावमध्ये भुजबळांनी जागा मिळावी हा हट्ट धरला तर काय करायचं? असे अनेक मतदारासंघातले पेच जेवढे दूर भासत आहेत त्यापेक्षा कित्येक पटींनी उमेदवारांना जवळ वाटू लागले आहेत. हाच कोल्हापूर निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ.