मुंबई : महागाईत वाढ झाल्याने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंडोनिशियाने तेलाची टंचाई आणि कच्च्या मालाच्या सर्व निर्यातीवर बंदी घातली आहे. या निर्णयाचा जगभरासह भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे भारतातील तेलाचे भाव आणखी भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आधी रशिया-युक्रेन युद्धामुळे सुर्यफूलाचे तेल आणि इतर तेलाच्या किंमतीत वृद्धी झाली आहे. असे असताना इंडोनिशियाच्या या निर्णयामुळे भारत पुन्हा संकटात येण्याची शक्यता आहे.
इंडोनेशिया पाम तेलाचा मोठा निर्यातदार देश आहे. २८ एप्रिलपासून सर्व शिपमेंट्स थांबवण्याचे निर्देश इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी दिली आहे. देशात खाद्यतेलाची उपलब्धता व्यवस्थित व्हावी आणि किमती स्थिर राहाव्यात यासाठी हा निर्णय घेतला आहे. मात्र टंचाईवर मात झाल्यास आणि महागाई नियंत्रणात आल्यास पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
भारतात पाम तेलाचा वापर जास्त प्रमाणात होतो. डिझेल-पेट्रोलमध्ये मिसळलेल्या जैव-इंधनात देखील पाम तेलाचा वापर केला जातो. जगभरातील सुमारे ५० टक्के घरगुती उत्पादनांमध्ये पाम तेलाचा वापर होतो. शाम्पू, आंघोळीचा साबण, टूथपेस्ट, व्हिटॅमिनच्या गोळ्या, मेकअपच्या वस्तू इत्यादींमध्येही पाम तेलाचा वापर केला जातो.