Thursday, March 20, 2025
Homeमहत्वाची बातमीही तर बेबंदशाही आहे

ही तर बेबंदशाही आहे

नारायण राणे यांचा घणाघाती प्रहार

मुंबई (प्रतिनिधी) : ‘महाराष्ट्रात सरकार आहे असे काही वाटत नाही. सरकारी पक्षच मुंबईतील वातावरण बिघडवत आहेत. येथे कायद्याचे राज्य नाही…ही तर बेबंदशाही आहे’, असा घणाघाती प्रहार केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर या वादात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही उडी घेतली.

‘शिवसेनेच्या नेत्यांची भाषणे किंवा पत्रकार परिषदा ऐकल्यानंतर मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे याचे या संजय राऊत, अनिल परब या सर्वांना भान आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यांच्याकडे सत्ता आहे ते एखाद्याला स्मशानात पोहोचविण्याची भाषा करत आहेत. संजय राऊत, अनिल परब सांगत होते, राणा यांना मुंबईत येऊ देणार नाही. हे फक्त बढाया मारत आहेत. मातोश्री येथे २३५ आणि राणा यांच्या घराजवळ केवळ १३५ शिवसैनिक आहेत’, असाही टोला राणे यांनी लगावला.

तत्पूर्वी, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आंदोलन संपवत असल्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेना नेते अनिल परब यांनी राणा दाम्पत्याने या सगळ्या प्रकारासाठी माफी मागितल्याशिवाय त्यांना घरातून बाहेर पडू देणार नसल्याचे जाहीर केले. त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये टीका केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकार आणि शिवसेना यांच्यावर टीकेची झोड उठविली.

‘राणा पती-पत्नीच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल. राज्यातील सरकारच वातावरण बिघडवत आहे. संजय राऊत आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांना मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा आहे, याची माहिती आहे की नाही? सत्ताधारी नेतेच धमक्या देऊ लागल्याने राज्यात पोलीस यंत्रणा आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. ‘मातोश्री’वर फक्त २३५ शिवसैनिक जमले होते आणि राणा यांच्या घरासमोर १२५ शिवसैनिक आले,’ असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.

‘मातोश्री’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा करणाऱ्या राणा दाम्पत्याने माफी मागावी, अशी मागणी करत शिवसैनिकांनी नवनीत राणा आणि रवी राणा वास्तव्यास असणाऱ्या खार येथील घराबाहेर प्रचंड गर्दी केली होती. आक्रमक झालेले शिवसैनिक राणा पती-पत्नीविरोधात जोरदार घोषणाबाजीही करत होते. तसेच राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांची माफी मागितल्याशिवाय त्यांना घराबाहेर पडू देणार नाही, असा पवित्रा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. शिवसेनेच्या या भूमिकेला आव्हान देण्यासाठी आता भाजपकडून नारायण राणे हे मैदानात उतरलेले दिसले.

तत्पूर्वी, ‘राणा कुटुंब घराबाहेर पडण्यासाठी तयार असेल, तर पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना जाऊ द्यावे. मात्र त्यांना जाऊ दिले नाही तर काही काळानंतर राणा दाम्पत्याला बाहेर काढण्यासाठी मी स्वत: त्यांच्या घरी जाईन, मग बघू तिकडे कोण येते,’ असे म्हणत नारायण राणे यांनी शिवसेनेला थेट आव्हान दिले होते.

राऊत, तुमच्या सगळ्या भानगडी बाहेर काढेन

राज्यसभेत खासदार म्हणून जात असताना मतदार यादीत संजय राऊतांचे नाव होते का? असा प्रश्न त्यांना विचारा. असेल तर त्यांना दाखवायला सांगा. त्यावेळी मी त्यांच्याबरोबर होतो. तुम्ही फसवणूक केल्याचा मी साक्षीदार आहे. तुमच्या भानगडी मी बाहेर काढीन. बाळासाहेबांच्या सांगण्यावरून मी तुम्हाला खासदार बनवले. मी त्यांना सोबत घेऊन गेलो आणि फॉर्म भरला. आक्षेप घेतल्यानंतर मी सांभाळून घेतले. तेव्हा ते खासदार झाले. तुम्हीसुद्धा फॉर्म भरताना खोटी कागदपत्रे सादर केलीत,” असा आरोप नारायण राणे यांनी केला. ‘थोड्या दिवसांनी ‘ईडी’ संजय राऊतांच्या तोंडात ‘विडी’ देणार आहे. अमरावती आमचा गड आहे असे राऊत म्हणतात. मग तिथे तुमचा खासदार का पडला? हे असेच चालू राहिले तर शिवसेनेचे १०-१५ आमदारही निवडून येणार नाहीत,’ असेही नारायण राणे यावेळी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -