Thursday, October 10, 2024
Homeमहत्वाची बातमीराणा दाम्पत्यावर गृहमंत्री संतापले

राणा दाम्पत्यावर गृहमंत्री संतापले

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्य वास्तव्यास असलेल्या खार येथील घराबाहेर मोठी गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना मुंबईत राजकीय तणावावर भाष्य केले आहे.

‘कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस आपलं कर्तव्य पार पाडत आहेत, मात्र राणा दाम्पत्यानेही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी. राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा वाचायची असेल तर त्यांनी आपल्या घरात वाचावी,’ असं आवाहन गृहमंत्र्यांनी केलं आहे. तसंच दुसऱ्याच्या घरी जाऊन ड्रामा करण्याची आवश्यकता नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हा ड्रामा सुरू आहे, कशासाठी चाललंय हे? जे काही करायचं ते आपआपल्या घरी करा. धर्माचा आदर असणारे लोक कमी आहेत का या जगात? की फक्त या दोघांनीच धर्माचा ठेका घेतला आहे? असा सवाल करत गृहमंत्री वळसे पाटील यांनी संताप व्यक्त केला.

‘मातोश्री’वर जाण्याचा प्रयत्न केल्यास राणा दाम्पत्याला ताब्यात घेण्यात येणार का? असा प्रश्न गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, पोलिसांना आपलं काम माहीत आहे, तणाव निर्माण झाल्यास काय करायचे याबाबतच्या स्पष्ट सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका करताना गृहमंत्र्यांनी एक गंभीर आरोपही केला आहे. ‘आजच्या घटनेनं महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, मात्र तणाव निर्माण झाल्यास त्याला राणा दाम्पत्य आणि त्यांना छुपा पाठिंबा देणारे लोक जबाबदार असतील. कोणाचा तरी छुपा पाठिंबा असल्याशिवाय राणा कुटुंब एवढं मोठं धाडस करणार नाही,’ असं गृहमंत्री म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -