पुणे : पोलीस शिपायाने फेसबुकच्या माध्यमातून विवाहित इंजिनिअर महिलेशी ओळख करुन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. अश्लिल फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने हे कृत्य केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. याप्रकरणी आरोपी ३४ वर्षीय विक्रम फडतरे सध्या पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागात कार्यरत असुन त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विक्रमने पीडितेला सप्टेंबर २०२१ मध्ये फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. विक्रमच्या फेसबुकबर काही ओळखीचे मित्र पीडितेला दिसले, म्हणून तिने रिक्वेस्ट स्वीकारली. दोघांमध्ये ऑनलाईन गप्पा सुरु झाल्या. दोघेही विवाहित असल्याने चर्चा मैत्रीपर्यंतच मर्यादित होती. मैत्री-मैत्रीत विक्रमने भेटण्याचे ठरवले. सुशिक्षित आणि इंजिनिअर पीडिता आयटी कंपनीत नोकरीला असल्याने आणि विक्रम पोलीस असल्याने भेटण्यात गैर नसल्याचे तिला वाटले. पण विक्रमच्या मनात नेमके काय चाललेय याची कल्पना पीडितेला नव्हती.
पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, भेटीच्या सत्रात विक्रमने एकेदिवशी पीडितेला थेट पिंपरी चिंचवडमध्ये आणले. एका लॉजमध्ये नेले अन् जबरदस्ती सुरू केली. शारीरिक संबंध ठेवले अन् नग्नावस्थेतील फोटो-व्हिडीओ काढले. हेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन असे अनेकदा धमकावत वारंवार इच्छेविरोधात जाऊन विक्रम फडतरे याने बलात्कार केला, असा आरोप करत पीडितेने भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी पोलीस शिपाई विक्रमला बेड्या ठोकल्या आहेत.