मुंबई : “राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. सरकार असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कायदा हाती घेतला आहे. गेल्या आठवड्यापासून सरकारच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या मदतीने उच्छाद मांडला आहे. भाजपाच्या पोलखोल यात्रेवर शिवसैनिकांनी दगडफेक करत तोडफोड केली. मोहित कंबोज रस्त्यावरून जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नवनीत राणांच्या बाबतीतही केवळ हनुमान चालिसा पठण हा एकच विषय होता. शिवसैनिकांच्या त्यांच्या घरापर्यंत जाऊ देण्यात आले, त्यांना अडवले नाही. ज्या पक्षाचे मुख्यमंत्री, त्या पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांच्या डोळ्यादेखत गुंडगिरी करत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात सरकारपुरस्कृत दहशत, गुंडगिरी झाली नाही. या गुंडगिरीचे समर्थन शिवसेना नेते करतात. सरकार आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. आणखी जर तुम्ही आक्रमक होणार असाल तर आम्ही हात बांधून गप्प बसणार नाही. जसे मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारल्यावर माशी डसते. तसे उत्तर आम्हीही देऊ शकतो. पण आम्ही कायदा पाळणारे आहोत. कायद्याला मानणारे आहोत. आम्ही याबाबत चोख उत्तर देऊ,” असा इशारा भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर काल रात्री शिवसैनिकांनी हल्ला केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानासमोरून जात असताना शिवसैनिकांनी हल्ला करत कंबोज यांच्यावर मातोश्रीच्या परिसराची रेकी केल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपा आक्रमक झाली असून आज भाजपाच्या मुंबईतल्या आमदारांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, “भाजपाचा संघर्षाचा इतिहास आहे. भाजपा नेत्यांनी टोकाचा संघर्ष केला आहे. आमच्या शेपटावर पाय ठेवून डिवचण्याचा प्रयत्न केला तर भाजपा शांत बसणार नाही. भाजपाही टिट फॉर टॅट करू शकते. पण आम्ही कायद्याला मानणारे, लोकशाही मानणारे आहोत. त्यामुळे कायद्याच्या मार्गाने जे करता येईल ते करू. आम्ही पोलिसात जाऊन आय़ुक्तांना निवेदन देऊ. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू. या हल्ल्याच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही काल केली आहे. आज सरकारच्या माध्यमातून होत असलेला दहशत पसरवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. मुख्यमंत्री मूग गिळून गप्प आहे. मुख्यमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्था हातात घ्यायला मोकळीक दिली आहे. राज्याच्या संस्कृतीला काळिमा लावण्याची कृती केलेली आहे”.